सातारा : पुणे येथे राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने अत्याचार केल्याप्रकरणी साताऱ्यातील २२ वर्षीय युवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फैजल फिरोज शेख (वय २२, रा. बुधवार पेठ, सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, फैजल हा शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंगचा व्यवसाय करतो. पुण्यातील एका तरुणीसोबत त्याची ओळख झाली. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवत बुधवार पेठेतील शक्कर तलावाच्या बाजूला असलेल्या एका अपार्टमेंटमधील प्लॅटटवर बोलावून घेत तिच्यासोबत जबरदस्तीने अत्याचार केला. तसेच तिचे फोटो व्हायरल करण्याची वारंवार धमकी दिली असल्याची फिर्यादेत पीडितेने नमूद केले आहे.
या प्रकरणी पीडित तरुणीने पुणे येथील लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फैजल शेख विरोधात गुन्हा नोंद केला आहे. हा गुन्हा लक्ष्मीनगर पोलिसांनी 'झिरो' नंबरने शाहूपुरी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक बाबर करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.