सातारा विधानसभा मतदारसंघासाठी 40 टेबल आणि 24 फेर्‍या

दुपारी एक वाजेपर्यंत निकाल होणार स्पष्ट

by Team Satara Today | published on : 22 November 2024


सातारा : सातारा विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी येथील शासकीय गोडाऊन मध्ये 40 टेबल ची व्यवस्था करण्यात आली असून 24 फेर्‍या मतमोजणीच्या होणार आहेत. यासाठी चारशे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. पहिल्या 15 टेबलवर टपाली मतांची मोजणी, तर 16 ते 35 टेबलवर मतदान यंत्रातील मतांची मोजणी होणार आहे, याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रांत सुधाकर भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

एमआयडीसी येथील शासकीय गोडाऊन मध्ये सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. सर्वप्रथम टपाली मतमोजणी होणार असून त्यानंतर ईव्हीएम मशीन मधील बंद मतांची मोजणी केली जाणार आहे. 40 टेबलवर 24 राउंड मध्ये मतमोजणी पूर्ण होणार आहे. साधारण दुपारी एक वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होतील, अशी माहिती देण्यात आली आहे. शुक्रवारी मतमोजणीच्या अनुषंगाने कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण पार पडले. निवडणूक निरीक्षक वंदना वैद्य, प्रांत सुधाकर भोसले, तहसीलदार नागेश गायकवाड, जावळी तहसीलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी हनुमंतराव कोळेकर, सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुध्दे यांनी सर्व मतमोजणी प्रक्रियेत सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

सातारा विधानसभा मतदारसंघात एकूण 3 लाख 42 हजार 672 एकूण मतदार आहेत. यामध्ये एक लाख 7 हजार 262 महिला, तर एक लाख 71 हजार 372 पुरुष मतदार आहेत. या निवडणुकीत समावेश असणार्‍या 464 मतदान केंद्रावर एक लाख 11 हजार एकशे वीस पुरुष मतदारांनी, तर एक लाख 6 हजार 656 महिलांनी अशा दोन लाख 17 हजार 700 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सातारा विधानसभा मतदारसंघासाठी 63.53% मतदान झाले आहे.

शनिवारी सातारा एमआयडीसी मध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सर्व ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम मध्ये सुरक्षित असून त्या पोलिसांच्या बंदोबस्तात गोडाऊनमध्ये हलवण्यात येणार आहेत. मतमोजणीसाठी एकूण 40 टेबल आहेत. पहिल्या 15 टेबलावर टपाली मतांची मतमोजणी होणार आहे, तर 16 ते 35 टेबलवर मतदान यंत्रातील मतांची मोजणी होणार आहे. याशिवाय नंतरच्या पाच टेबलवर सैनिकांच्या मतांची मोजणी होणार आहे. या मतमोजणीसाठी सुमारे 400 कर्मचार्‍यांची नियुक्ती आहे. या सर्व प्रक्रिया दीड वाजेपर्यंत पूर्ण होतील, असे सुधाकर भोसले यांनी सांगितले आहे.

एमआयडीसी परिसरातील गोडाऊन मध्ये मतमोजणीची तयारी युद्ध पातळीवर सुरू आहे. मतदान यंत्रे ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूम परिसरात कडेकोट केंद्रीय सुरक्षा दल, राज्य राखीव पोलीस दल व पोलीस असा त्रिस्तरीय सशस्त्र बंदोबस्त तैनात आहे. परिसरात कोणालाही सोडले जात नाही. संपूर्ण परिसरावर सीसीटीव्ही कॅमेर्‍यांवरुन नजर ठेवली जात आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
निकालाच्या आधीच कार्यकर्त्यांची गुलालाची तयारी
पुढील बातमी
मारामारी सह आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी जमावावर गुन्हा

संबंधित बातम्या