'अभंग तुकाराम’ चित्रपटाचा संगीत सोहळा संपन्न

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार उपस्थित

by Team Satara Today | published on : 14 October 2025


संत तुकाराम महाराजांच्या अभंगांची गाथा दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘अभंग तुकाराम- कथा संत तुकारामांच्या गाथेची… या चित्रपटातील कलाकारांच्या साथीने अदभूत असा संगीत आनंद सोहळा नुकताच मोठय़ा उत्साहात आणि भक्तिरसात संपन्न झाला. भक्तीचा ताल, टाळ-मृदंगाच्या गजरात ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’नामाचा घोष करत आलेली दिंडी, चित्रपटातील कलाकारांनी केलेले सादरीकरण, गायकांनी सादर केलेले अभंग, तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या भक्ती-शक्ती संगमाचा ऐतिहासिक क्षण ‘याची देही याची डोळा’ रसिकांनी मनात साठवला.

राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री मा.आशिषजी शेलार यांच्या हस्ते चित्रपटाचा संगीत लोकार्पण सोहळा संपन्न झाला. चित्रपटाशी संबंधित कलाकार, तंत्रज्ञ यांचा सत्कार आशिषजी शेलार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना आशिषजी शेलार म्हणाले, ‘आपल्या संस्कृतीचे मूळ आणि महाराष्ट्राच्या भूमीला अपेक्षित असे संतविचार दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि त्यांची टीम चित्रपटाच्या माध्यमातून ज्या यशस्वीपणे पोहचवतायेत, त्यासाठी त्यांचे अभिनंदन. संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५०व्या जयंती वर्षी हा चित्रपट येणे हा सुंदर योग आहे. संत तुकाराम महाराजांची महती माहीत नाही, अशी व्यक्ती या जगात नाही. आपण बोलतो ती वाचा आणि वाचेला दैवी निष्ठेचा परिमळ स्पर्श झाला की, वाचेचे रूपांतर वाणीत होते. संत तुकारामांच्या या वाणीतून लिहिलेले, गायलेले आणि समोर आलेले अभंग मग नादब्रह्मात परावर्तित झाले आणि ऐकणाऱ्याला जो यातून मिळत होता तो ‘ब्रह्मानंद’. ही संतपरंपरा मानणारे आपण सर्वजण आहोत म्हणून महाराष्ट्रात, जगात आणि संत परंपरेवर विश्वास असणाऱ्यांसाठी ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटाचं स्थान अगदी उच्च आहे. संत परंपरेत आणि भक्ती परंपरेत विलीन होण्याची आत्मिक शक्ती आमच्या नागरिकांमध्ये जागृत होऊ दे. इच्छाशक्ती आणि आत्मिक शक्ती एकत्र येते त्यावेळेला ब्रह्मानंदाचे टाळ वाजतात. विठ्ठलाच्या चरणी या चित्रपटाच्या यशाची प्रार्थना करताना या चित्रपटाला त्यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या.

एका चांगल्या चित्रपटाचा भाग होता आल्याचा आनंद व्यक्त करताना पॅनोरमा स्टुडिओजचे चेअरमन कुमार मंगत पाठक यांनी सांगितले की, हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचवणे आम्हाला गरजेचे वाटले. समाजाला नवा दृष्टिकोन आपल्याला देता यावा म्हणून आम्ही हा चित्रपट घेऊन आलो आहोत. त्याला प्रेक्षकांचा नक्की उत्तम प्रतिसाद मिळेल,असा विश्वास आहे. पॅनोरमा स्टुडिओज ही नामांकित निर्मिती संस्था या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. चित्रपटाचे निर्माते कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, अजय अशोक पूरकर, दिग्पाल लांजेकर असून सहनिर्माते मुरलीधर छतवानी, रवींद्र औटी आहेत.

थोर संतपरंपरा हे आपले सांस्कृतिक वैभव. प्रापंचिक हलाहल पचवून पुढील पिढ्यांसाठी सद्विचारांचे अभंगामृत ठेवणारे संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे चरित्र म्हणजे दीपस्तंभाप्रमाणे आहे. त्याच तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगांमधून जीवन जगण्याच्या तत्त्वज्ञानाची जी शिदोरी दिली, हाच ठेवा दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘अभंग तुकाराम’ चित्रपटरूपाने ७ नोव्हेंबरला आपल्या भेटीला येणार आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खिदमत ए खल्क संस्थेचे कार्य आदर्शवत
पुढील बातमी
नैसर्गिक उपाय; 'या' फळांमुळे होईल सर्दी खोकला दूर!

संबंधित बातम्या