सातारा : सातारा जिल्हा केटरिंग असोसिएशनचा स्नेहमेळावा 2025-26 सातारा शहरात मंगळवारी मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, पुणे जिल्ह्यांतील पदाधिकारी उपस्थित होते. याचबरोबर सातारा मंडप असोसिएशनचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सातारा केटरर्स संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरत सुखदेव वैष्णव यांनी महाराष्ट्रातील सर्व केटरर्स बांधवांचे आभार मानत या स्नेहमेळाव्यामुळे केटरिंग क्षेत्रातील ऐक्य व संवाद अधिक दृढ झाल्याचे सांगितले. तसेच कोणत्याही प्रसंगी प्रत्येकाच्या पाठिशी संघटना ठाम राहणार असे त्यांनी सांगितले.
या मेळाव्यात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहिले होते. यामध्ये महिला सभासदांची संख्या सुद्धा लक्षणीय होती. जिल्ह्यातील तब्बल 260 सभासदांनी हजेरी लावली. प्रत्येक सभासदाला स्मृतिचिन्ह, सर्टिफिकेट आणि गोल बॅच देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी 20 स्टॉलधारकांनीही सहभाग घेतला. यामध्ये डिशवाले, डेअरीवाले, मसालेवाले व क्रॉकरी वस्तू अशा विविध स्टॉल्समुळे मेळाव्याचे स्वरूप रंगतदार झाले. कार्यक्रम दिवसभर चालू राहिला. सकाळपासून नाश्ता, चहापान तर दुपारी स्नेहभोजन अशा उत्तम व्यवस्थेसह संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले.
यावेळी संतोष भट, सांगली जिल्हा केटरींग असोसिएशनचे अध्यक्ष, ज्ञानेश्वर पिसे, अध्यक्ष इचलकरंजी केटरर्स असोसिएशन, विवेक शिंदे, अध्यक्ष कोल्हापूर केटरर्स असोसिएशन, विजय बर्गे, सातारा जिल्हा अध्यक्ष मंडप लाईट असोसिएशन, जिल्हा केटरर्स संघटनेचे उपाध्यक्ष दिपक शिंदे, सेक्रेटरी रमेश पाटील यांच्यासह विविध तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.