सातारा : महाराष्ट्रातील शिवपराक्रमाचा साक्षीदार असणार्या बारा गडकोट किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळाले आहे, ही नक्कीच आनंदाची बाब आहे. छत्रपती शिवरायांचा या गडकोटांच्या निमित्ताने घडलेला पराक्रम आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. यामध्ये केंद्र व राज्य सरकार यांचा पाठपुरावा निश्चित महत्त्वाचा आहे. या गडकोटांच्या पुनर्संवर्धनाचा आराखडा संस्कृतिक विभाग, पर्यटन विभाग व पुरातत्व विभागाच्या माध्यमातून तयार करून त्याची अंमलबजावणी केली जाईल, अशी स्पष्ट ग्वाही राज्याचे पर्यटन मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील इत्यादी उपस्थित होते.
शंभूराज देसाई म्हणाले, गेल्या दोन वर्षापासून सांस्कृतिक व पर्यटन विभाग छत्रपती शिवरायांच्या काळात त्यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या आणि शिवपराक्रमाचा साक्षीदार असलेल्या गडकोटांच्या वारसास्थळांच्या यादी संदर्भात पाठपुरावा सुरू होता. केंद्र सरकारने तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारसास्थळ समितीकडे गडकोट किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि त्यांच्या भूरचना याची माहिती आणि त्याची वैशिष्ट्ये तपशीलवारपणे मांडली. वेगवेगळ्या देशांच्या राजदूतांना गडकोट किल्ल्यांची माहिती देण्यात आली. या किल्ल्यांच्या स्थापत्याचे एकमेवत्त्व मान्य करून युनेस्कोच्या संवर्धन समितीने शिवकालीन गडकोट किल्ल्यांना वारसा स्थळांमध्ये स्थान दिले आहे. यामध्ये स्वराज्याची राजधानी रायगड किल्ला, राजगड किल्ला, शिवपराक्रमाचा साक्षीदार असलेला प्रतापगड किल्ला, शिवरायांच्या जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ला, लोहगड किल्ला, साल्हेर किल्ला, पन्हाळा किल्ला, सुवर्णदुर्ग किल्ला, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग किल्ला, खंदेरी व जिंजी (तामिळनाडू ) या किल्ल्यांचा समावेश या यादीमध्ये झालेला आहे. या किल्ल्यांना सैनिकी लँडस्केप म्हणून ओळखले जाते. यापुढे हे किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जातील. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटनाला वेगळी ओळख मिळून येथे पर्यटन वाढेल. तसेच स्थानिक रोजगारामध्ये सुद्धा वाढ होणार आहे.
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची आंतरराष्ट्रीय स्वरूपावर ओळख व्हावी या दृष्टीने या बारा किल्ल्यांचे पुर्नसंवर्धन तेथील स्थापत्य याचा आराखडा बनवून त्याचे विकसन केले जाणार आहे. तसेच किल्ल्यांवरील जुने रहिवाशी जे आहेत, जे वंशपरंपरेने तेथे निवास करतात, त्यांच्या कार्यक्षेत्रावर कामावर कोणत्याही मर्यादा येणार नाहीत, असे शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले. सातारा जिल्ह्यातील अन्य जे किल्ले आहेत त्या किल्ल्यांना सुद्धा जिल्हा नियोजन समिती तसेच सांस्कृतिक विभागाशी संवर्धन धोरण काय आहे दृष्टीने चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पर्यटन विभागाचा अधिभार घेतल्यापासून महाराष्ट्रात पर्यटन वाढावे यासाठी आमच्या विभागाचे जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रातील रायगड, शिवनेरी, सिंहगड, प्रतापगड, अजिंक्यतारा आणि पन्हाळा या किल्ल्यांना पर्यटनाच्या दृष्टीने सुविधा देणे आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ऐतिहासिक स्वरूपाच्या इमारती पुनर्जीवित करणे असा गड पर्यटन आराखडा बनवण्यात आला आहे. प्रतापगडाचे काम यापूर्वीच सुरू झाले असून अन्य गडांची कामे लवकरच सुरू केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.