कोरेगाव : श्री स्वामी विवेकानंद यांचे आचार, विचार वाचून, समजून घेऊन त्यांचे अनुकरण केल्यास प्रत्येकाचे जीवन बदलून जाईल, असा विश्वास बेलूर मठ येथील रामकृष्ण मठ व मिशनचे उपाध्यक्ष रामकृष्ण मठाचे अध्यक्ष स्वामी दिव्यानंदजी महाराज यांनी केले.
चिमणगाव (ता. कोरेगाव) येथील श्री सारदादेवी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित विवेकानंद ह्यूमन एक्सलन्स ॲकॅडमीच्या आवारात श्री स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुणे येथील रामकृष्ण मठाचे अध्यक्ष स्वामी श्रीकांतानंद महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
यावेळी श्री सारदादेवी चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्षा शकुंतला काटकर, शंकरराव काटकर, सुरेंद्रकुमार काटकर, आदिती काटकर, डॉ. रवींद्रकुमार काटकर आदी मान्यवर उपस्थित होते. स्वामी श्रीकांतजी महाराज म्हणाले, ‘‘सुरेंद्रकुमार काटकर व डॉ. रवींद्रकुमार काटकर हे दोघे बंधू आपापले संसार उत्तमपणे सांभाळून ग्रामीण भागातील मुलांना उत्तम क्रमिक शिक्षणाबरोबर मूल्य शिक्षण देत आहेत, ही बाब कौतुकास्पद आहे. आवारातील रामकृष्ण परमहंस मंदिर, स्वामी विवेकानंद पुतळा विद्यार्थ्यांना चांगली प्रेरणा देतील.’
यावेळी मान्यवरांच्या हस्ते मंदिर परिसरामध्ये वृक्षारोपणही केले. सुरेंद्रकुमार काटकर यांनी स्वागत केले. शिक्षिका निर्मला वाघ यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य अशोक साळी यांनी परिचय करून दिला. मुख्याध्यापिका सीमा घाडगे यांनी आभार मानले.