सातारा : पाटण तालुक्यातील तारळी खोऱ्यातील दरडप्रवण, भूसख्लन भागात अदानी उद्योग समुहाचा प्रकल्प सुरु आहे. त्याबाबतची प्रथमत: सर्व इत्थंभूत माहिती प्रशासन व आम्हांला द्यावी. त्याचबरोबर आमच्या संमतीशिवाय व आम्हांला विचारात घेतल्याशिवाय हा प्रकल्प सुरु करु नये, अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल, अशी एकमुखी मागणी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या समोर प्रकल्पग्रस्त यांनी जनभावना व्यक्त केल्या.
पाटण तालुक्यातील तारळी खोऱ्यात कळंबे, डफळवाडी, केंजेवाडी, भोकरवाडी, बागलेवाडी, चिमणवाडी, बामणेवाडी या दरडप्रवणग्रस्त व भूसख्लन प्रकल्पग्रस्त गाव व परिसरात अदानी उद्योग समुहाचा प्रकल्प सुरु होत आहे. तो आमच्या संमतीशिवाय सुरु करण्यात येवू नयेत, या मागण्या आज शुक्रवारी प्रकल्पग्रस्तांच्या सुनावणीवेळी जनभावना जिल्हा प्रशासन यांच्यापुढे व्यक्त करण्यात आल्या. यावेळी कंपनीचे प्रतिनिधीही उपस्थित होते.
आमची पाटण तालुक्यातील गावे भूस्खलन, दरडग्रस्त आहेत. ती पूर्णत: घरे खाली करुन तेथील ग्रामस्थांना शाळेच्या ठिकाणी वास्तव्यास ठेवले जाईल. दरम्यान, अदानी उद्योग समुह कंपनीच्या प्रतिनिधींने स्थानिक प्रकल्पग्रस्त यांना कोणतीही सूचना न देता किंवा संमतीशिवाय उभे अडवे होल घेत डोंगर पोखरले जात असतील तर त्यामुळे भविष्यात येथील नागरिकांना धोका निर्माण होवू शकतो. याबाबत कंपनीने विचार करावा.
आज तारळी खोऱ्यातील भूसख्लन, दरडग्रस्त भागातील ६0 ते ७0 टक्के जमीनी या विकल्या गेल्या आहेत. पण रााहिलेल्या जमीनीच्यावर काहीही करु नये, इथे तुमच्या जागेचा आम्ही वापर करणारच अस अलिखीत फतवा अदानी उद्योग समुहाच्या प्रतिनिधींनी काढला आहे. तो अत्यंत चुकीचा आहे. अदानीचा प्रकल्प असला तरी सध्या काम करतेय दुसरीच कंपनी जमीन खरेदी करतेय तिसरीच कंपनी त्यामुळे परवानगी मागतेय चौथीच कंपनी. त्यामुळे आता कंपनी नेमके काम कशा पध्दतीने करणार आहे. इथे नेमकं काय प्रकल्प सुरु केला जाणार आहे. याबाबतची इथंभूत माहिती प्रकल्पग्रस्त आणि जिल्हा प्रशासन यांना देवून त्यानंतरच काम सुरु करावे, अशी आग्रही मागणी सर्वच प्रकल्पग्रस्त यांनी यावेळी केली.
यावेळी सुनील सपकाळ, सखाराम सपकाळ, बाळासो सपकाळ, विजय सपकाळ, नवनाथ सपकाळ, गोरखनाथ सपकाळ आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले की, तारळी खोऱ्यातील जो नियोजित प्रकल्प सुरु करत आहात. त्याबाबत स्थानिकांना बरोबर घ्यावे. त्यासाठी भूसख्लन भागातील गावाकडे कंपनी प्रतिनिधींनी जावून गावाच्या सर्व समस्यांचे निराकरण करावे. त्यानंतर वेळ मिळाल्यासह मी ही येवून जाणार आहे, असे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले.