सातारा जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेची संधी; निर्णय पुन्हा पक्षश्रेष्ठींकडे जाण्याची शक्यता : जिल्ह्यातील नेत्यांचे वरिष्ठांकडे लक्ष

by Team Satara Today | published on : 11 February 2026


सातारा : सातारा जिल्हा परिषदेमध्ये 27 जागा मिळवणारा भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरला तरी बहुमता अभावी त्यांना सत्तेच्या काठावरच थांबावे लागले आहे. दुसरीकडे अजित दादा पवार गटाला दुसऱ्या क्रमांकाचे यश मिळाले असून सातारा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेची संधी उपलब्ध झाली आहे. शिवसेना व राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात राजकीय सख्ख्य झाल्यास सत्तेची समीकरणे सोपी होणार आहेत. मात्र तरीही सत्तास्थापनेचा पेच हा वरिष्ठांच्या कोर्टात जाण्याची दाट शक्यता आहे. भारतीय जनता पार्टी सुद्धा वरिष्ठांच्या आदेशाकडे लक्ष देऊन असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय आदेश देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

सातारा जिल्हा परिषदेच्या निकालामध्ये भारतीय जनता पार्टीला 27 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 23 जागा मिळाल्या आहेत शिवसेना शिंदे गटाला 15 जागा मिळाल्या असून हा कौल सत्ता स्थापनेच्या दृष्टीने त्रिशंकू स्वरूपाचा ठरला आहे .भारतीय जनता पार्टीने सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये स्वबळाचा नारा देत आघाडीचे प्रस्ताव नाकारले .ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मान तालुक्यासह वाई पाटण या दोन मतदारसंघांमध्ये सुद्धा विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले .विशेषता पालकमंत्री शंभूराजे देसाई यांना त्यांनी टार्गेट केले होते. आता त्रिशंकू परिस्थितीमुळे जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेच्या चाव्या शिवसेना व राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे गेले आहेत. त्यामुळे भाजपची सातारा जिल्ह्यात अडचण झाली आहे.

पालकमंत्री शंभूराजे देसाई व मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी साताऱ्यात भाजपला वगळून चर्चेची प्राथमिक फेरी केल्याने सत्ता स्थापनेच्या हालचाली वेगळ्या अर्थाने गतिमान झाल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेच्या सत्तेत भाजपला बाजूला ठेवायची रणनीती आकाराला येत आहे .भारतीय जनता पार्टी आता याबाबत प्रदेश कार्यकारिणीचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाईल. त्या दृष्टीने एकनाथ शिंदे यांच्याशी युतीबाबत बोलणी केली जाणार असल्याची चर्चा आहे. 

शिवसेनाला उपाध्यक्ष पद तसेच काही समितीचे अध्यक्ष पद देत जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आपल्याकडे ठेवण्याची भाजपची रणनीती दिसून येत आहे. त्या दृष्टीने मजबूत मोर्चे बांधणी ही वरिष्ठ पातळीवरून होणार असल्याने शिवसेना आणि भाजप कशा पद्धतीने राजकीय समीकरणे जुळवतात हे पाहणे महत्त्वाचे आहे .दुसरीकडे शिवसेना सदस्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे आपण अध्यक्ष पदासाठी आग्रही राहावे असा सूर अळवला आहे. येत्या दोन दिवसात शिवसेना पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पालकमंत्री शंभूराज देसाई व संपर्कप्रमुख शरद कणसे यांच्या उपस्थितीत होणार आहे आणि तेथील अहवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लवकरच सादर होणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्ह्यात पायाभूत सुविधांसाठी वाढीव 346 कोटींची मागणी करणार - पालकमंत्री शंभूराज देसाई; जिल्हा नियोजन समितीची बैठक
पुढील बातमी
विषय समित्यांच्या निवडीमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी; बाळासाहेब खंदारे, धनंजय जांभळे, अशोक शेडगे, मोनिका घोरपडे, सुजाता गिरिगोसावी, संकेत साठे, शंकर किर्दत यांना संधी

संबंधित बातम्या