सातारा : ऑलिंपिकमध्ये भारताला वैयक्तिक क्रीडा प्रकारात पहिले पदक मिळवून देणारे महान कुस्तीपटू, ऑलिंपिक वीर स्वर्गीय पै. खाशाबा जाधव यांची १०१ वी जयंती १५ जानेवारी रोजी पोलीस कवायत मैदान, सातारा येथे उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी स्व.पै. खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. जयंतीनिमित्त पोलीस कवायत मैदान येथे सुरु असलेल्या सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीचे नामकरण “स्व. पै. खाशाबा जाधव पोलीस क्रीडा प्रबोधिनी, सातारा” असे करण्यात आले. या नामकरणाचा सोहळा पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या हस्ते पार पडला.
या प्रबोधिनीत कुस्ती, बॉक्सिंग, ज्युदो, वेटलिफ्टिंग, ऍथलेटिक्स,मल्लखांब तसेच बास्केटबॉल अशा विविध क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण दिले जात असून सध्या सुमारे ५०० प्रशिक्षणार्थी येथे नियमित प्रशिक्षण घेत आहेत.यावेळी मार्गदर्शन करताना अपर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडुकर यांनी स्व. पै. खाशाबा जाधव यांच्या जीवनकार्याची व ऑलिंपिकमधील ऐतिहासिक कामगिरीची माहिती दिली. त्यांच्या संघर्ष, जिद्द व देशभक्तीपासून प्रेरणा घेऊन प्रशिक्षणार्थींनी भविष्यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्वल कामगिरी करावी, असे आवाहन त्यांनी केले.या कार्यक्रमास पोलीस अधिकारी, कर्मचारी, क्रीडा प्रशिक्षक, प्रशिक्षणार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्व. पै. खाशाबा जाधव यांच्या स्मृतीस उजाळा देणारा हा कार्यक्रम क्रीडा व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.