सातारा : शाहूनगरमधील घरफोडीची उकल करण्यात सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले आहे. यामध्ये एका सराईत गुन्हेगारास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 19 रोजी शाहूनगर येथे गणेश हाउसिंग सोसायटीत घरफोडी करून एक लाख 27 हजारांचा मुद्देमाल चोरून नेणार्या चैतन्य विशाल माने वय 19, रा. 150 ब, रविवार पेठ याला अटक करण्यात आली आहे. सातारा शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने रविवार पेठ परिसरातून संबंधित गुन्हेगाराला अटक करून त्याच्याकडील मुद्देमाल जप्त केला आहे. अधिक चौकशीसाठी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
सातारा शहर परिसरातील वाढत्या घरफोडीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी रात्रगस्त वाढवण्यात आली आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक सचिन मेत्रे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने रविवार पेठ परिसरातून विशाल माने याला अटक केली. त्याच्याकडून सोन्याचे दागिने, पितळेची भांडी, चिल्लरचा डबा इत्यादी वस्तू ताब्यात घेण्यात आल्या आहेत. मागील वर्षी शाहूनगर येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तारांगण ऑफिस या चोरट्याने फोडले होते. येथील बंद कपाटाचे दरवाजे त्याने तोडले. मात्र तेथे काही आढळून आले नाही.
सातारा पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, सातारचे उपविभागीय अधिकारी राजीव नवले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शाम काळे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पोलीस हवालदार किशोर जाधव, निलेश यादव, सुजित भोसले, शंकर चव्हाण, निलेश जाधव, विक्रम माने, पोलीस नाईक पंकज मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल सचिन रिटे, इरफान मुलाणी, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम, तुषार भोसले यांनी सहभाग घेतला.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांनी या कारवाईचे अभिनंदन केले आहे.