सातारा : सातारा नगरपालिका कंत्राटी कामगारांचे 2- 4 महिने व त्यापेक्षा जास्त ठेकेदार यांनी महिन्याचे पगार दिलेले नाहीत व पगार मागणी केल्यावर संबंधित ठेकेदार कंत्राटी कामगार कामावरून काढण्याची धमकी देतो, तसेच महिन्याला कामगाराचे पीएफ भरले जात नाहीत. आरोग्य विमा देत नाहीत या मागण्याबाबत रयत क्रांती जनरल कामगार संघटनेने जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची भेट घेवून निवेदन दिल्यावर श्री. पाटील यांनी दोन दिवसात कामगार यांना राहिलेल्या महिन्याचे पगार तात्काळ अदा करण्यात यावे व नियम व अटींचे उल्लंघन करणाऱ्या कामगार पुरवठा ठेकेदारांचे ठेके रद्द करुन त्यांना काळ्यात यादीत समाविष्ट करावे, असे निर्देश दिले.
सातारा पालिकेतील कंत्राटी कामगारांवर होणाऱ्या अन्यायाबाबत रयत क्रांती जनरल कामगार संघटनेचे कामगार नेते प्रा. गणेश वाघमारे यांनी कामगारांसमवेत जात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची भेट घेतली. त्यांना निवेदन देत कामगारांवर होणाऱ्या अन्यायाचा पाढा वाचला.
यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी कामगारांच्या प्रश्नांची गांभीर्य समजून घेत थेट मुख्याधिकारी अभिजीत बापट व सहाय्यक कामगार आयुक्त कवले यांना फोन करून ज्या ठेकेदार यानी कामगार यांचे पेमेंट 2 महिने व त्यापेक्षा जास्त महिने दिलेले नाही आणि कामगार यांना कामगार. कायद्यानुसार सेवा न देता कामावरून काढण्याची धमकी देवुन कामगार यांच्यावर दबाव निर्माण करून कामगारांचे शोषण करीत आहेत. आणि वारंवार ज्या ठेकेदार यांना करारनामा मधील नियम व अटींचे उल्लंघन केले आहे अशा सर्व नगरपालिका सातारा कामगार पुरवठा करणारे ठेकेदार यांचे ठेके तात्काळ रद्द करून त्यांना काळ्या यादीत समाविष्ट करण्यात यावे तसेच पुढील दोन दिवसात कामगार यांना राहिलेल्या महिन्याचे पेमेंट तात्काळ अदा करण्यात यावे असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
कामगार नेते प्रा. गणेश वाघमारे यांनी कामगारांच्या अन्यायाला वाचा फोडली. आता जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या आदेशानुसार कार्यवाही करून कामगारांच्या बँक खात्यात किमान वेतन कायद्यान्वये शिल्लक सर्व महिन्याचे दोन दिवसात पेमेंट जमा केले नाही तर आम्ही संघटना व कामगार यांचे वतीने दि. 26 जानेवारी प्रजासत्ताकदिनी ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निवासस्थान बाहेर अन्न त्याग आंदोलन करणार असल्याचे सांगितले. यावेळी शेकडो कंत्राटी कामगार महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.