डॉक्टरांशिवाय तपासण्या करणार्‍या लॅबचा पर्दाफाश; कराडमधील प्रकार; मुंबई, पुणे, कोल्हापूरच्या 17 जणांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 10 December 2025


कराड :  येथील भेदा चौकातील मेट्रोपोलिस हेल्थ केअर लिमिटेड लॅबोरटरीमध्ये रक्त, लघवीच्या तपासण्या तज्ज्ञ डॉक्टरांशिवाय होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यात नवी मुंबई, पुणे, कोल्हापूर येथील 17 जणांच्या टोळीचा पोलीसांनी पर्दाफाश केला असून दोन डॉक्टरांसह लॅब चालकावरही कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत डॉ. संदीप यादव यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. डॉ. सुशील शहा व डॉ. स्मिता सुडके (दोघे, रा. पुणे), अमिरा सुशील शहा, विवेक गंभीर, संजय भटनागर, मिलिंद सरवदे, अनिता रामचंद्रन, हेमंत सचदेव, कमलेश कुलकर्णी (सर्व, रा. नवी मुंबई), विनायक दंताल (रा. कोल्हापूर), विद्याधर भागवत, प्रवीण कांबळे, सुषमा चव्हाण, अनिलकुमार जाधव, योगिनी व्यास, सतीश जाधव, सचिन मोरे (सर्व रा. कराड) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भेदा चौक येथे मेट्रोपोलिस हेल्थ केअर लिमिटेड नावाने फेब्रुवारी 2023 पासून लॅबोरटरी कार्यरत होती. तेथे रुग्णांचे रक्त, लघवीचे नमुने घेतले जात होते. त्यांच्या चाचण्या करुन त्याचा अहवाल दिला जात होता. तो अहवाल त्यातील तज्ज्ञ डॉ. स्मिता सुडके यांच्या नावाने दिला जात होता. मात्र, त्यांची स्कॅन केलेली स्वाक्षरी, नाव व शैक्षणिक पात्रता याचा वापर केला जात होता. डॉ. सुडके पॅथॉलॉजी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिलच्या नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायिक आहेत. मात्र, त्या येथील मेट्रोपोलिस हेल्थ केअरमध्ये स्वतः हजर न राहता त्यांच्या अनुपस्थितीत तेथील तंत्रज्ञ व अन्य व्यक्ती स्वतः चाचणी अहवाल तयार करुन देत होते. त्यावर डॉ. स्मिता सुडके यांचे नाव व सही छापलेली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लॅबोरेटरीचे अहवाल फक्त पॅथोलॉजी विषयात पदव्युत्तर असलेल्या मेडिकल कौन्सिलशी नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाने प्रती स्वाक्षरीत करणे बंधनकारक आहे. वैद्यकीय परिषदेशी नोंदणीकृत नसणार्‍या व्यक्तीने वैद्यक व्यवसाय करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे डॉ. संदीप यादव यांनी याबाबतची तक्रार पोलिसात दिली. पोलिसांनी मेडिकल कौन्सिल मुबंई व अन्य संबधित विभागाचा अभिप्राय घेऊन दखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मोबाईल व्यावसायिकांचा वाद शहर पोलीस ठाण्यात; नीलेश मोरे यांची मध्यस्थी : स्थानिकांना मिळाला न्याय
पुढील बातमी
हिंदी शिक्षक महामंडळाच्या राज्यस्तर निबंध स्पर्धेत भिलारच्या बगाडे व पेठच्या शेवाळे प्रथम

संबंधित बातम्या