निवडणुकीसाठी मनुष्यबळाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे राज्य निवडणूक आयोगाकडून अभिनंदन

by Team Satara Today | published on : 02 February 2026


 सातारा : राज्यातील 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक 2026 संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने सुधारीत वेळापत्रक जाहीर केले असून त्यानुसार दि.7 फेब्रुवारी रोजी मतदान व 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक कामकाजासाठी जिल्ह्यातील शिक्षकांच्या सेवा घेण्यात आल्या असून त्यास अनुसरुन प्रशिक्षण सत्रेही पुर्ण झाली आहेत. तथापि केंद्रीय शिक्षक पात्रता परिक्षा पूर्व निर्धारीत वेळापत्रकानुसार देशभरात दि. 7 व 8 फेब्रुवारी रोजी होत आहेत. निवडणूक कामकाजासाठी घेण्यात आलेले अनेक शिक्षक या परिक्षेसाठी परिक्षार्थी आहेत.  त्यामुळे निवडणूक कामकाजासाठी मनुष्यबळ उपलब्धता हा पेच अनेक जिल्ह्यात निर्माण झालेला असताना सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी यासबंधी अत्यंत कुशल व सुरळीत नियोजन केल्याबद्दल राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी अभिनंदन केले.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक सुधारीत वेळापत्रक व त्याबाबतची पुणे विभागीय आढावा बैठक राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे, यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतली.  यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी,  महसूल उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण हे सातारा जिल्ह्यातून दूरदुशष्य प्रणालीद्वारे बैठकीसाठी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी निवडणूक तयारी, झालेले नियोजन, याबाबत आढावा देताना म्हणाले, सातारा जिल्ह्यात निवडणुकीसाठी 12668 एवढे संख्याबळ आवश्यक आहे. त्या तुलनेत 13097 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. केंद्रीय शिक्षक प्रवेश पात्रतेच्या परिक्षेमुळे जिल्ह्यातील 2009 शिक्षकांचे नियुक्ती आदेश रद्द करण्यात आले आहेत.  तर 2254 शिक्षकांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. 

निवडणूक कामकाजासाठी पूर्वीच 16 टक्के जादा शिक्षकांची नियुक्ती केल्याने व त्यांना आवश्यक प्रशिक्षण दिल्याने परिक्षेमुळे परिक्षार्थी शिक्षकांची नियुक्ती रद्द केली तरी सातारा जिल्ह्यात निवडणूक कामकाजावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले.

या बैठकीत पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आढावा दिला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महाराष्ट्राच्या विकासाचे दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी योगदान देणे हीच खरी श्रध्दांजली ठरेल - जिल्हाधिकारी संतोष पाटील
पुढील बातमी
वडूजला मतदान जागृतीसाठी नवमतदारांशी वैयक्तिक संवाद; उत्साहाने मतदान करा- नवमतदार आनंदा इंगळे

संबंधित बातम्या