सातारा : मूळच्या भटक्या विमुक्त 42 जमातींचा समावेश आंध्र व तेलंगणा राज्यात आदिवासींमध्ये झालेला आहे हे हैदराबाद गॅझेट मधून दिसून येते. त्यामुळे महाराष्ट्रात भटक्या विमुक्तांना ओबीसी मधून वगळण्यात यावे व त्यांचा समावेश आदिवासी प्रवर्गात करावा अशी मागणी उपराकार पद्मश्री लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत केली .अन्यथा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही होऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.
येथील शासकीय विश्रामगृहामध्ये लक्ष्मण माने यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे सरचिटणीस नारायण जावळीकर, दत्ता मेंढकर, अशोक जाधव, मच्छिंद्र जाधव,हरिदास जाधव, रामभाऊ जाधव, दीपक जाधव, निलेश मोरे, इत्यादी उपस्थित होते .
लक्ष्मण माने पुढे म्हणाले,. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य सरकार जाहीर करणार आहे. निवडणुका जाहीर करण्यापूर्वी त्यांनी भटक्या प्रवर्गातील 42 जमातींना ओबीसीमधून वगळावे आणि स्वतंत्रपणे साडेपाच टक्के जागा भटक्या विमुक्तांना देण्याचा निर्णय तातडीने घ्यावा अन्यथा आम्ही राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही. यामध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारचे राहील,भटक्या विमुक्त संघटनेचे काम राज्यातील मुंबईसह 29 जिल्ह्यांमध्ये आहे याचीही नोंद राज्यकर्त्यांनी घ्यावी आम्हाला वगळूनं या निवडणुका सरकार करू शकणार नाही व वेळप्रसंगी न्यायालयातही आम्ही या संदर्भात दाद मागू , असा इशारा त्यांनी दिला.
ओबीसी प्रवर्गात आणून राज्य शासनाने आमचे नुकसानच केले आहे असे सांगून लक्ष्मण माने म्हणाले, गेल्या पन्नास वर्षापासून भटक्या प्रवर्गांना केंद्र शासनाच्या बजेटमध्ये प्रवर्गशीर्ष नाही. राज्यकर्ते आम्हाला सांगत होते बाहेरच्या राज्याचा संदर्भ येथे चालत नाही. आंध्र तेलंगणा कर्नाटकमध्ये प्रदेश या राज्यांमध्ये जरी तुम्ही अनुसूचित जाती जमातीमध्ये असला तरी तो संदर्भ आपल्याला वापरता येत नाही. मग हैदराबाद गॅझेट सातारा गॅझेट बॉम्बे गॅझेटचा संदर्भ वापरून मराठा समाजाला कुणबी म्हणून प्रमाणपत्र देण्याचा जो जीआर काढण्यात आला आहे तो संदर्भ बाहेरच्या राज्यांचा कसा चालतो. यासंदर्भात 16 ऑक्टोबर 2025 रोजी आम्ही शनिवार वाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर पश्चिम महाराष्ट्रातील 42 जमातींचा मोर्चा काढून जिल्हाधिकारी पुणे यांना निवेदन दिले. मूळच्या भटक्या जमातींना आदिवासी प्रवर्गात आणलेच पाहिजे.समाजात मोठ्या संख्येने असलेल्या उच्चवर्णीय जमातींनी मोर्चे काढून आरक्षणाची कोंडी फोडली त्याबद्दल मराठा क्रांती मोर्चाचे नेते मनोज जरांगे यांचे लक्ष्मण माने यांनी आभार मानले.