सातारा : देगाव-सातारा रस्त्यावर परफेक्ट कंपनीजवळ मंगळवारी (दि. 2) ट्रकने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत ओमकार जयवंत गवळी (वय 20, रा. भोसले कॉलनी, कोडोली) याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रथमेश प्रशांत माने (वय 20, रा. कोडोली) आणि त्याचा मित्र ओमकार गवळी हे मंगळवारी (दि. 2) मोटारसायकलवरून देगावहून सातार्याकडे निघाले होते. परफेक्ट कंपनीसमोर त्यांच्या मोटारसायकलला सायंकाळी 6.30 च्या सुमारास ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत ओमकार गवळी खाली पडला आणि ट्रकचे मागील चाक त्याच्या अंगावरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याबाबत प्रथमेश माने यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक राठोड तपास करत आहेत.