सातारा, दि. 16 : ट्रॅक्टर व पोकलँड भाड्याने मिळतील, ही जाहिरात समाजमाध्यमांवर पाहून, राष्ट्रीय महामार्गाचे कंत्राट मिळाल्याची बतावणी करत, फलटण येथील शेतकरी विनय संपत माने यांचे दोन ट्रॅक्टर व जेसीबी भाड्याने घेऊन परस्पर विक्री करणार्या परप्रांतीय टोळीचा फलटण पोलिसांनी फर्दाफाश केला आहे. याप्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून 65 लाख रुपयांची वाहने जप्त करण्यात आली आहेत.
मोहम्मद मुश्ताक मोहम्मद हुसेन (वय 38, रा. वासावी काझी मोहल्ला, जि. चित्रदुर्ग, कर्नाटक) आणि ईदमा हबीब रहमान कुंजबिहारी (वय 64, रा. मुडबिंद्री, ता. मंगलोर, जि, दक्षिण कन्नड, कर्नाटक) यांना फलटण पोलिसांनी कर्नाटकात पकडले. त्यांनी परस्पर विकलेले ट्रॅक्टर आणि पोकलँड तमिळनाडूतून जप्त करण्यात आले आहे .
याबाबत माहिती अशी, ट्रॅक्टर व पोकलँड भाड्याने मिळतील, अशी जाहिरात फलटण येथील शेतकरी विनय संपत माने यांनी फेसबुकवर दिली होती. ही जाहिरात पाहून मुश्ताक हुसेन याने माने यांच्याशी संपर्क साधला. आपल्याला राष्ट्रीय महामार्गाचे कंत्राट मिळाल्याची बतावणी करून, मुश्ताकने माने यांच्याकडून ट्रॅक्टर व पोकलँड भाड्याने घेतले. ते घेऊन तो कर्नाटकमध्ये गेला. भाडेवसुलीसाठी माने यांनी मुश्ताकला फोन केला असता, तो बंद होता.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने, विनय माने यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी संशयितांचा मुंबईत कसून शोध घेतला असता, ते कर्नाटकमध्ये गेल्याचे समजले. पोलिसांनी ईदमा हबीब रहमान कुंजी याला कर्नाटकमधून ताब्यात घेतले. मुश्ताक हुसेन याने हे ट्रॅक्टर व पोकलँड तमिळनाडूमध्ये परस्पर विकल्याचे तपासात स्पष्ट झाले. शेतकर्यांना सरकारी कामाच्या खोट्या वर्क ऑर्डर दाखवून, त्यांच्याकडून ट्रॅक्टर व पोकलँड भाड्याने घेत, दुसर्या राज्यात विकणार्या आंतरराष्ट्रीय टोळीचे ते सदस्य असल्याचेही तपासात समोर आले आहे.
फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजयमाला गाजरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष कदम, पूनम बोबडे, काकासाहेब करणे, अतुल बडे, जितेंद्र टिके यांनी ही कारवाई केली.