यवतेश्वर येथे होणारा बालविवाह तालुका पोलिसांनी रोखला; सातारा तालुका पोलिसांची कारवाई

by Team Satara Today | published on : 23 January 2026


साताारा : सातारा तालुका पोलीसांनी यवतेश्वर येथे होणारा बालविवाह रोखला. शुक्रवार दि २३ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार मालोजी चव्हाण यांना यवतेश्वर (ता. सातारा) येथे बालविवाह होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक पाठवून तात्काळ कारवाई करण्यात आली.

पोलीस हवालदार मालोजी चव्हाण, किरण जगताप यांच्यासह बालकल्याण समितीच्या प्रतिनिधी सुजाता शिंदे, तनया घोरपडे तसेच ग्रामसेविका प्रज्ञा माने यांना घटनास्थळी पाठवण्यात आले. घटनास्थळी अनिल जाधव (रा. केसरकर पेठ, सातारा) यांच्या अल्पवयीन मुलीचा आणि शहानु पिटेकर यांच्या मुलाचा बालविवाह लावण्यासाठी नातेवाईक जमल्याचे यावेळी पोलिसांना आढळून आले. मात्र, होणारे नववधु-वर मुलगा व मुलगी हे दोघेही त्या ठिकाणी उपस्थित नव्हते. यानंतर संबंधित मुलगा, अल्पवयीन मुलगी तसेच त्यांच्या नातेवाईकांना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले. त्यांच्याकडून बालविवाह न करण्याबाबत बॉण्ड लिहून घेण्यात आला असून, कायदेशीर समज देण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी दिली. पोलीस प्रशासन आणि बालकल्याण समिती यांच्या तत्पर कारवाईमुळे संभाव्य बालविवाह रोखण्यात यश आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शाहुपुरी परिसरातील सराईत टोळी तडीपार; सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यातून २ वर्षांची हद्दपारी
पुढील बातमी
साताऱ्यात शुक्रवारी शेंद्रे गणातून एकाची माघार; शेंद्रे गणातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता

संबंधित बातम्या