सातारा : संबोधी प्रतिष्ठानच्यावतीने या वर्षापासून दिवंगत प्रसिद्ध साहित्यिक कथाकार सुधाकर यशवंत उर्फ सु. य. बोरगावकर यांच्या स्मरणार्थ नवोदित लेखकाच्या प्रथम प्रकाशित कथा संग्रहासाठी राज्यस्तरीय पुरस्कार योजना सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी २०२५ साला मध्ये प्रकाशित झालेले कथासंग्रह पाठवावेत असे आवाहन, संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश इंजे व निमंत्रक,संयोजक दिनकर झिंब्रे यांनी केले आहे.
कथाकार सु. य. बोरगावकर हे ख्यातनाम साहित्यिक कथाकार वामन होवाळ तसेच प्रसिद्ध साहित्यिक सरोजिनी बाबर यांचे अत्यंत जवळचे स्नेही होते. त्यांचे हुरडा व हिसका हे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. तसेच त्यांच्या अनेक कथा, कविता प्रबुद्ध भारत नियतकालिक तसेच विविध मासिके व दैनिकांमध्ये प्रकाशित झाल्या आहेत.
या पुरस्काराचे स्वरुप दहा हजार रुपये धनादेश, सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ असे आहे. त्यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या संबोधी प्रतिष्ठानच्या या पुरस्कारासाठी नवोदित लेखकाचा १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रसिद्ध होणारा पहिला कथासंग्रह विचारात घेतला जाईल. त्यासाठी लेखक अथवा प्रकाशकांनी आपल्या साहित्य कृतीच्या दोन प्रती १५ जानेवारी २०२६ पर्यंत निमंत्रक, संयोजक, दिनकर झिंब्रे, 9881599991 व्दारा हर्ष अॅडव्हरटायझर्स, छत्रपती शाहू स्टेडियम शॉप नंबर तीन, शक्ती स्पोर्ट्स जवळ, सातारा - 415001 पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.