सातारा : श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगरवाचनालय मार्फत शासनाच्या वाचन पंधरावडा उपक्रमांतर्गत वेगवेगळ्या वाचनविषयक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
नगर वाचनालयामध्ये चरित्र विषयक ग्रंथांच्या प्रदर्शनामार्फत या वाचन उपक्रम पंधरावड्याचा शुभारंभ झाला.उद्घाटन प्रसिद्ध सिने समीक्षक पद्माकर पाठकजी यांचे हस्ते झाले. यावेळी संचालक साहित्यिक डॉ. राजेंद्र माने,नगर वाचनाचे अध्यक्ष अजित कुबेर, सर्व कर्मचारी आणि वाचक वर्ग उपस्थित होते.
पद्माकर पाठकजी म्हणाले, "शासनाच्या अशा उपक्रमांमधून लोकांच्यात वाचना विषयीची आवड निर्माण होईल.शिवाय, वाचन संस्कृतीला बळ मिळेल. व्यस्त दिनक्रमामध्येही माणसाने वाचायला पाहिजे." डॉ.राजेंद्र माने म्हणाले, "ग्रंथा मधून माणसाला शिकायला मिळते . परिस्थितीच्या चढउतारातही ग्रंथ मित्रासारखे आपली साथ सोबत करतात. अनेकांनी लिहिलेली त्यांची आत्मचरित्रे आपल्याला खूप काही देऊन जातात. दिवसातून अर्धा तास का होईना ? माणसाने वाचन केले पाहिजे. त्यासाठी ग्रंथालयांचे सभासद व्हावे."
शुक्रवार दि.३ रोजी सकाळी ९।। वा.ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी डॉ.राजेंद्र माने व अनिल वीर यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम होणार आहे. अशी माहिती ग्रंथपाल रुपाली मुळे यांनी दिली.
याकामी, विष्णू धावडे यांनी वाचनालयाच्या ग्रंथपाल रूपा मुळे, उल्का शिंदे, अन्वेषा कलेढोणकर, कारवे व विजय दळवी अथक परिश्रम घेत आहेत.