कोयनेत पावसाचा जोर कमी

धरणात प्रतिसेकंद सरासरी 19,568 क्युसेक पाण्याची आवक

by Team Satara Today | published on : 01 August 2025


पाटण : कोयना धरणांतर्गत जलाशयात पावसाचा जोर कमी झाला आहे. धरणात प्रतिसेकंद सरासरी 19,568 क्युसेक पाण्याची आवक होत असून पाणीसाठा 86.04 टीएमसी झाला आहे. धरणात येणार्‍या पाण्याची आवक कमी झाली आहे, तरीही आगामी काळात होणारा पाऊस लक्षात घेता धरणाचे सहा वक्री दरवाजे गुरुवारी सकाळी अकरा वाजता चार फूटांवरून दोन फूट करण्यात आले आहेत. धरणाच्या दरवाजातून विनावापर प्रतिसेकंद 10,571 व पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून 2,100 असे एकूण 12,671 क्युसेक पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे.

कोयना धरण शिवसागर जलाशयात कोयना, नवजा, महाबळेश्वर या तिन्ही विभागात सध्या कमी प्रमाणात पाऊस पडत आहे. या पावसामुळे धरणांतर्गत छोट्या नद्या, नाले, ओढे, धबधबे यातून पाण्याची आवक होत आहे. सध्या धरणाच्या दरवाजातून दोन फुटांनी प्रतिसेकंद 10,571 व पायथा वीज गृहातील वीस मेगॅवॅट क्षमतेच्या दोन जनित्रांद्वारे चाळीस मेगॅवॅट वीजनिर्मिती करून 2,100 असे प्रतिसेकंद एकूण 12,671 क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे.

दरम्यान धरणात ज्या पटीत पाण्याची आवक होईल त्यानुसार कमी जास्त पाणी सोडण्याचा विचार असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे. बुधवारी संध्याकाळी पाच ते गुरुवारी संध्याकाळी पाच या चोवीस तासात धरणातील पाणीसाठ्यात 1.70 टीएमसीने वाढ झाली आहे. याच चोवीस तासातील व एक जून पासून पडलेला पाऊस पुढीलप्रमाणे कोयना 24 (3034) मिलिमीटर, नवजा 29 (3335) मिलिमीटर महाबळेश्वर 28 (3439) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

धरणात सध्या उपयुक्त पाणीसाठा 81.04 टीएमसी, पाणी उंची समुद्रसपाटीपासून 2147.11 फुट तर जलपातळी 654.685 मीटर इतकी झाली आहे. 105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेले हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास यापुढे 19.21 टीएमसी पाण्याची गरज आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वनताराची टीम नांदणीला देणार भेट
पुढील बातमी
उपराष्ट्रपती पदासाठी 9 सप्टेंबरला होणार मतदान

संबंधित बातम्या