सातारा : कोरेगाव येथील पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या कार्यपद्धतीविषयीचा मुद्दा पुन्हा एकदा विधिमंडळात गाजला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेत हा प्रश्न उपस्थित करत सरकारकडे ठोस कारवाईची मागणी केली.
बुधवारी झालेल्या चर्चेदरम्यान आमदार शिंदे यांनी सभापती प्रा. राम शिंदे यांच्या मार्फत संबंधित प्रकरणाचा पुरावा म्हणून एक पेन ड्राईव्ह राज्य सरकारकडे सादर केला. या पेन ड्राईव्हमधील माहितीनुसार चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी सरकारच्या वतीने गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी उत्तर देताना कोरेगाव पोलीस ठाण्याऐवजी पुसेगाव पोलीस ठाण्याच्या कारवाईची माहिती देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. मात्र, उपस्थित प्रश्नाच्या अनुषंगाने चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्याचा शब्द त्यांनी सभागृहात दिला.
आमदार शशिकांत शिंदे हे पोलीस निरीक्षक बल्लाळ यांच्या कार्यपद्धतीविरोधात सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेत आहेत. मागील अधिवेशनांमध्येही त्यांनी सातत्याने हा मुद्दा उपस्थित करून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. बुधवारी पुन्हा एकदा हा विषय चर्चेत आल्याने कोरेगावमधील पोलीस प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, सरकारकडून चौकशीचा शब्द दिला असला तरी प्रत्यक्षात कोणती कारवाई होते, याकडे कोरेगाव तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून आहे. एकूणच पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांची कारकीर्द सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.