सातारा : स्थानिक गुन्हे शाखेने लोणंद बसस्थानक परिसरात सापळा लावून अवैध अग्निशस्त्र विक्रीसाठी आलेल्या पाच जणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून ३ देशी बनावटीची पिस्टल, ५ जिवंत काडतुसे, मारुती सुझुकी इर्टिगा कार व ६ मोबाईल हॅन्डसेट असा एकूण १२ लाख ६७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तुषार दोशी पोलीस अधीक्षक, सातारा व डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे व विक्री करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व रोहित फार्णे यांच्या अधिपत्याखाली पथक तयार केले.
१४ फेब्रुवारी रोजी विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली की, वाई येथील काही इसम मारुती सुझुकी इर्टिगा (क्र. MH-12-NE-9210) मधून लोणंद बसस्थानक परिसरात देशी पिस्टल व काडतुसे विक्रीसाठी येणार आहेत. खात्रीशीर माहितीच्या आधारे पथकाने परिसरात सापळा लावून संशयितांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये निखील शिवाजी मोरे (वय २८, रा. गंगापुरी, वाई), आयुष चंद्रकांत अडसुळ (वय २०, रा. रविवार पेठ, वाई), यश बबन चव्हाण (वय २१, रा. बावधन, ता. वाई), नितीन दत्ता वाडकर (वय २८, रा. बावधन, ता. वाई) आणि सनी काशिनाथ भोसले (वय ३४, रा. खानापूर, ता. वाई) यांचा समावेश आहे.
त्यांच्या विरोधात लोणंद पोलीस ठाण्यात गु.र.नं. ७३/२०२६ भारतीय शस्त्र अधिनियम (सुधारीत) २०१९ चे कलम ३, ७ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, परितोष दातीर तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी संबंधित अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले आहे.