सातारा : सातारा जिल्ह्याचे राजकारण यशवंत विचारांनी चालते आणि या संस्कृतीला निखळ राजकीय परंपरा आहे, हे शुक्रवारी पुन्हा एकदा अधोरेखित झाले. माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या चिरंजीवांच्या विवाह सोहळ्यात राजकीय मांदियाळी पाहायला मिळाली. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी स्वागत कक्षामध्ये पहिल्या रांगेतील राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ दिला. या राजकीय स्नेहाची राजकीय वर्तुळाच जोरदार चर्चा झाली.
याशिवाय राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार शशिकांत शिंदे यांच्याशी उदयनराजे भोसले यांनी निखळ हास्यविनोद केला. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गट यांच्यामध्ये सध्या राजकीय मतभेद आणि सत्ता स्पर्धेची जोरदार चुरस आहे. सध्या राष्ट्रवादी सातारा जिल्ह्यात बॅकफूटवर असून भारतीय जनता पार्टीचे राजकीय ग्रह जोरात आहेत. जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचे आठ आमदार आणि चार कॅबिनेट मंत्रीपदे यामुळे सातार्याचा बलाढ्य राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी हेच उत्तर आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाने सुद्धा सातार्यात आपल्या अस्तित्वाची धडपड चालवलेली आहे. असे असताना कराडमध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या चिरंजीवांच्या विवाह सोहळ्यामध्ये राष्ट्रवादीचे आजी-माजी लोकप्रतिनिधी पुन्हा एकदा एकत्र आले. स्वागत कक्षामध्ये अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रथम रांगेमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बसले होते. त्यांना पाहताच खासदार उदयनराजे भोसले यांनी आवर्जून त्यांच्या जवळ जात त्यांना नमस्कार केला व पुष्पगुच्छ देऊन आपला स्नेह वृद्धिंगत केला. शरद पवार यांनी सुद्धा उदयनराजे भोसले यांना नमस्कार करत त्यांच्या पुष्पगुच्छाचा स्वीकार केला.
राजकीय प्रतिस्पर्ध्याची सर्व अवधाने यावेळी गळून पडली होती. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कॉंग्रेसचे माजी आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार शशिकांत शिंदे यांच्याशी उदयनराजे भोसले यांनी निखळ हास्यविनोद करत सगळे वातावरण हलके फुलके करून टाकले. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच जोरदार राजकीय चर्चा झडल्या. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निमित्ताने पुन्हा राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी जोरदार राजकीय रस्सीखेच होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या अनौपचारिक स्नेह बंधनांची जिल्ह्यात जोरदार चर्चा होताना दिसते आहे.