वडूज : मुंबईत झालेल्या 26/11 च्या अतिरेकी हल्ल्यावेळी गिरगाव या ठिकाणी जे ऑपरेशन झाले या ठिकाणी इस्माईल मारला गेला व कसाब जिवंत सापडला. न्यायालयात खटला चालला आणि माझ्या जबानीवरूनच कसाबला फाशी झाली. मी गोळ्या लागल्याने जखमी होतो, मात्र, मला स्टेनगन उचलता आली असती, तर अनेक लोकांचे प्राण वाचले असते. ही घटना आज ही आठवली तर रात्रभर झोप लागत नाही, अशी खंत मुंबईतील अतिरेकी हल्ल्यात जखमी झालेले वडूज, ता. खटाव येथील शौर्यपदक विजेते पोलीस अधिकारी अरुण जाधव यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी सांगितलेल्या थरारक अनुभवाने उपस्थित स्तब्ध झाले होते.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरावर पाकिस्तानी अतिरेक्यांनी 26/ 11/ 2008 रोजी दहशतवादी हल्ला केला होता. त्याला उद्या 17 वर्षे पूर्ण होत आहेत. याचेच औचित्य साधून या हल्ल्यातील जखमी पोलीस अधिकारी शौर्यपदक विजेते वडूज गावचे सुपुत्र अरुण जाधव यांचा त्यांचे निवासस्थानी जाऊन त्यांच्या मातोश्री व परिवाराचा भटक्या विमुक्त संघटनेच्यावतीने संघटनेचे सरचिटणीस रामचंद्र जाधव यांनी गौरव केला. सत्कारप्रसंगी सेवानिवृत्त केंद्रप्रमुख एस. के. जाधव, किशोर जाधव, पुष्कर जाधव व कुटुंबीय उपस्थित होते
यानंतर श्री अरुण जाधव यांनी केलेल्या मनोगतातून 26/ 11 च्या हल्ल्याची दाहकता पुन्हा एकदा समोर आली. अरुण जाधव म्हणाले, 17 वर्षानंतर ही आजही खंत आहे ती या हल्ल्यातील अतिरेकी कसाब व इस्माईल यांना मी मारू शकलो असतो परंतु हातात तीन गोळ्या व खांद्यावर दोन गोळ्या लागल्याने ट्रिगर घन उचलण्याची ताकद माझ्यामध्ये नव्हती. वीस मिनिटे मी त्यांच्याबरोबर प्रवास केला एक एक सेकंद मी मृत्यूचा सामना करीत होतो. माझी थोडी हालचाल झाली असती तर त्यांनी माझ्यावर फायर करून, मीही मारला गेलो असतो, ते त्यावेळी माझ्यासमोर निघून गेले परंतु मला काहीही करता आले नाही. संपूर्ण प्रसंग अंगात धडकी भरवणारा होता.
त्यांनी सांगितले 26 /11/2008 रोजी आम्ही क्वालीस गाडीतून वरिष्ठ पोलीस अधिकारी हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर, योगेश पाटील, ड्रायव्हर भोसले व अन्य एक जण असे एकूण सात जण या गाडीमध्ये होतो. आम्ही कसाब व इस्माईल या दोन अतिरेक्यावर गोळ्या झाडल्या त्यामध्ये ते जखमी झाले. त्यांनी प्रत्युत्तर दाखल आमच्यावर जबरदस्त गोळीबार केला. त्यामध्ये वरिष्ठ अधिकारी गंभीररित्या जखमी झाले व काही वेळाने ते शहीद झाले. माझे हातावर तीन गोळ्या व खांद्यावर दोन गोळ्या लागलेल्या होत्या. त्यामध्ये योगेश पाटील हे मृत्यूशी झुंज देत होते. हे दोघे ड्रायव्हर व योगेश पाटील माझ्या अंगावर शवाप्रमाणे पडलेले होते. अतिरेकी कसाब व इस्माईल यांनी आमच्या पोलीस गाडीचा ताबा घेतला आणि त्याच दरम्यान योगेश पाटील यांच्या वडिलांचा फोन आला. फोन वाजतोय योगेश पाटील उचलणार तेवढ्यात हालचाल झाल्याने कसाबने त्याच्यावर गोळ्या झाडल्या त्यामध्ये योगेश पाटील ही शहीद झाले.
एक एक सेकंद मृत्यूशी झुंज
जवळजवळ वीस मिनिटे त्यांच्याबरोबर आमचा प्रवास राहिला एक एक सेकंद मृत्यूची झुंज दिली. मी जखमी होतो. माझी हालचाल झाली असती तर मलाही त्यांनी मारले असते. मी तसाच निपचित पडलो. माझ्या हातावर तीन गोळ्या व खांद्यावर दोन गोळ्या लागल्याने माझ्या हातामध्ये स्टेन गन उचलण्याची ताकद नव्हती, मी त्यांना मारू शकलो असतो, परंतु मारू शकलो नाही, ते जिवंत निघून गेले. फायरिंग मध्ये टायर वर गोळी लागल्याने, वीस मिनिटानंतर विधानभवन ठिकाणी पूर्ण टायर खाली बसला. त्यामुळे गाडी चालणे बंद झाले. त्यामध्ये वायरलेस वरून सूचना दिली गाडीतून फायरिंग होत आहे कोणीही तिकडे जाऊ नये. मी नंतर लगेच कुठलीही हालचाल करतो, तर पोलिसांकडूनही मारला जाऊ शकत होतो.
माझ्या जबानीवरूनच कसाबला फाशी
ते दोघे समोरून येणार्या स्कोडा गाडीला अडवून त्यातील दोघांना उतरवून त्यातून पळून गेले. नंतर मी याच वायरलेस वरून पोलीस मुंबई पोलिसांना सुचित केले. सदर अतिरेकी या दिशेने स्कोडा गाडीतून पळून गेले आहेत. माझी ही इन्फॉर्मेशन योग्य ठरली व मुंबई पोलीस अलर्ट झाले व गिरगाव या ठिकाणी जे ऑपरेशन झाले या ठिकाणी इस्माईल मारला गेला व कसाब जिवंत सापडला. न्यायालयात खटला चालला आणि माझ्या जबानी वरूनच कसाबला फाशी झाली. यावेळी मला स्टेनगन उचलता आली असती, तर अनेक निरअपराध लोकांचे प्राण वाचले असते. ही घटना आज ही आठवली तर रात्रभर झोप लागत नाही.