डॉ. बसवेश्वर चेणगे यांना राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते प्रदान ; दर्पणकारांच्या जन्मगावी विशेष सन्मान

by Team Satara Today | published on : 08 January 2026


कराड : महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या वतीने मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक 'दर्पण'कार ‌आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार डॉ. बसवेश्वर चेणगे यांना पत्रकार दिनी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोंभुर्ले (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) या जन्मगावी त्यांच्या नावाने महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या दर्पण सभागृहात पत्रकार दिनी पुरस्कार वितरणाचा हा दिमाखदार सोहळा झाला. याप्रसंगी मुंबई दूरदर्शनचे माजी सहाय्यक केंद्र संचालक जयेंद्र भाटकर, पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ, माजी आमदार प्रमोद जठार, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा पोलीस प्रमुख मोहन दहीकर, कृष्णा शेवडीकर, बाळशास्त्री जांभेकर यांच्या परिवारातील बाळा जांभेकर, पोंभुर्लेच्या सरपंच प्रियांका धावडे यांच्यासह राज्यभरातील प्रमुख पत्रकार उपस्थित होते.

डॉ. बसवेश्वर चेणगे हे सातारा जिल्ह्यातून प्रसिद्ध होणाऱ्या गुंफण दिवाळी अंकाचे संपादक असून व्यासंगी व अभ्यासू पत्रकार म्हणून ते परिचित आहेत. राज्यातील विविध वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रसिद्ध होत असते. मराठी भाषेच्या जतन संवर्धनात त्यांचे मोलाचे योगदान असून सीमा भागात सातत्याने साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचे धाडस ते दाखवत असतात. त्यांच्या या व्यापक कार्याची नोंद घेऊन त्यांना दर्पण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

मराठी पत्रकारितेत दर्पण पुरस्काराला सर्वोच्च मानाचे स्थान आहे. हा पुरस्कार लाभणे पत्रकारांसाठी अतिशय भूषणावह आहे अशा शब्दात सभापती प्रा. राम शिंदे यांनी पुरस्कार विजेत्यांचा गौरव केला. जिल्हाधिकाऱ्यांनी या स्थळाच्या विकासाचा बृहत आराखडा तयार करावा. त्यासाठी आपल्या स्थानिक विकास निधीमधून पैसे दिले जातील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी यावेळी पत्रकार कल्याण निधीच्या कार्यासाठी पाच हजार रुपयांची देणगी जाहीर केली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या सातारा शहराध्यक्षपदी सुनील काळेकर यांची नियुक्ती, उपाध्यक्षपदी सचिन बागल
पुढील बातमी
साहित्य संमेलनाच्या अटकेपार डिजीटल स्मरणीकेचे प्रकाशन; 18 लाख लोकांपर्यंत स्मरणीका पोहचणार- ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले

संबंधित बातम्या