साताऱ्यात गुरुवारी रात्री कोयता-दगडांचा राडा; दोन गट आमने-सामने; पोलिस गस्तीसमोरच दहशत, सहा जणांवर गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 19 December 2025


सातारा  : सातारा शहरात गुरुवारी रात्री सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास दोन गटांमध्ये कोयते व दगडांचा वापर करून एकमेकांवर हल्ला करत प्रचंड राडा केल्याची घटना घडली. मुख्य रस्त्यावरच उघडपणे मारहाण, शिवीगाळ व दमदाटी सुरू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेत लक्ष्मण पिटेकर, पवन जाधव, विशाल, बबड्या, बालक आणि चिक्या (सर्वांची पूर्ण नावे व पत्ते अद्याप माहित नाहीत) यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणी पोलीसांनी स्वत: फिर्याद दाखल केली असून पोलीस विक्रम माने यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

संशयित आरोपींनी बेकायदा जमाव जमवून एकमेकांच्या गचांड्या धरत मारहाण केली. यावेळी कोयते व दगडांचा वापर करण्यात आला. एकमेकांना अश्लील शिवीगाळ करत दमदाटी केल्याने रस्त्यावर एकच गोंधळ उडाला. घटनेच्या वेळी पोलिस गस्तीवर असतानाच हा प्रकार घडला. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही संशयितांनी पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत राडेबाजी सुरूच ठेवली.

दोन्ही गटांवर गुन्हा दाखल

अखेर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत दोन्ही गटांतील संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मोती चौक येथे भरधाव कार हॉटेलवर आदळून अपघात; एक जण जखमी

संबंधित बातम्या