मुंबई : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनमध्ये तिसऱ्या आठवड्यात घरातील सदस्यांना डबल धक्का मिळाला. कारण घरातील दोन सदस्य तिसऱ्या आठवड्यात घराबाहेर पडले. निखिल दामले आणि योगिता चव्हाण या दोघांनीही घरातल्या सदस्यांचा आणि बिग बॉसचा निरोप घेतला. घरातून बाहेर पडल्यानंतर योगिता चव्हाणने मुलाखतीमध्ये सांगितले. यावेळी तिने घरातील परिस्थितीविषयी भाष्य केलं आहे.
योगिता 21 दिवस बिग बॉसच्या घरात राहिली. पण घरातील भांडणं, राडे या सगळ्यांमुळे तिला घरातील वातावरण फारसं आवडतही नव्हतं. तसं तिने भाऊच्या धक्क्यावर दुसऱ्या आठवड्यात रितेश भाऊंना सांगितलं होतं. त्यानंतर कॅप्टन्सी टास्कमध्ये योगिताचा खेळही सगळ्यांना आवडला. त्याचं कौतुकंही झालं. पण तिसऱ्या आठवड्यात तिला घराबाहेर पडावच लागलं.
योगिताने दिलेल्या मुलाखतीमध्ये निक्की, अरबाज, वैभव आणि जान्हवी यांच्या टीमविषयी बोलताना म्हटलं की, मला त्या दुसऱ्या टीममधलं कुणीच नाही आवडत. कारण त्या टीममध्ये कुणीही एकट्याने आणि स्वत:साठी खेळत नाही. तिथे निक्की मनाने सगळी सूत्र हलवते. तिचा एक हुकुमशाहीपणा तिथे आहे आणि बाकी सगळे तिच्या हाताखाली कामं करतात. ती तिचा खेळ बरोबर खेळते पण हे इतरांनाही कळायला हवं.
सूरज चव्हाण हा बिग बॉसच्या घरातील स्पर्धक सध्या सगळ्यांचा लाडका झाला असल्याचं चित्र आहे. सूरजविषयी बोलताना योगिताने म्हटलं की, सूरज हा स्टारच आहे. पहिल्या आठवड्यात जेव्हा आम्ही आलो तेव्हा आम्हाला तो खूप शांत वाटला होता. पण हळू हळू आम्ही त्याला ओळखायला लागलो. कॅप्टन्सी टास्कमध्ये तो जसं खेळला आहे, त्याच्या समोर मी काहीच खेळले नाही. त्याने त्या तिघांना अक्षरश: फाडून खाल्लं.
दरम्यान घरातले कोणते स्पर्धक पुढे जातील असा प्रश्न यावेळी योगिता विचारण्यात आला. त्यावर योगिताने अंकिता, सूरज, धनंजय पोवार, अभिजीत या स्पर्धकांची नावं घेतली. त्यामुळे आता बिग बॉसच्या घरात कुणाचा खेळ गाजणार आणि कुणाचा लवकर संपणार याची उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे.