साताऱ्यात दोन्ही राजांचे जोरदार शक्तिप्रदर्शन; जिल्ह्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, आज मतदान, उद्या निकाल

by Team Satara Today | published on : 01 December 2025


सातारा: जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांसह स्थानिक नेत्यांनीही पणाला लावलेली प्रतिष्ठा, आरोप - प्रत्यारोप, त्यातून निर्माण झालेली कमालीची ईर्षा आणि चुरशीने ढवळून गेलेल्या राजकीय वातावरणात सातारा जिल्ह्यात ९ नगरपालिका तर एका नगरपंचायतीसाठी आज सोमवारी रात्री १० वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या. आज अखेरीच्या दिवशी सातारा येथे बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत काढलेली रॅली लक्षवेधी ठरली. उद्या मंगळवार, दि. २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून बुधवार दि. ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याने जिल्ह्याचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.

जिल्ह्यातील सातारासह वाई, महाबळेश्वर, पाचगणी, फलटण, म्हसवड, रहिमतपूर, कराड आणि मलकापूर या ९ नगरपालिका तर मेढा नगरपंचायतीसाठी उद्या मंगळवार दि. ३ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. रविवारी न्यायालयाने महाबळेश्वर आणि फलटण या दोन नगरपालिकांच्या निवडणुका लांबणीवर टाकल्यामुळे जिल्ह्यात ७ नगरपालिकांसाठी मतदान होत आहे. ७ नगरपालिकांमध्ये सातारा, रहिमतपूर, कराड आणि वाई 

नगरपालिका निवडणुकांमध्ये मोठी चुरस निर्माण झाली होती. साताऱ्यात बंडखोरांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे खा. उदयनराजे भोसले, ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना जातीने प्रचारात आघाडी घ्यावी लागली. दुसरीकडे सातारा शहरातील गांधी मैदानावर महाविकास आघाडीने एकजूट दाखवत जबरदस्त वातावरण निर्मिती केली. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आ. शशिकांत शिंदे, माजी मंत्री महादेव जानकर, नरेंद्र पाटील, सुवर्णा पाटील यांनीही प्रचारात आघाडी घेत सातारा पालिकेची निवडणूक बिनविरोध अथवा एकतर्फी होणार नाही याची चुणूक दाखवून दिली. ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही शहरात ठिकठिकाणी पदयात्रा काढून भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याचे आपल्या कृतीतून दाखवून दिले. 

रहिमतपुर येथील नगरपालिका निवडणुकीसाठी खा. नितीन पाटील, ना. मकरंद पाटील हे थेट निवडणुकीच्या रिंगणात प्रचारासाठी उतरले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रहिमतपूर येथे सभा घेतल्यानंतर ना. जयकुमार गोरे, ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही रहिमतपूर येथे तातडीच्या सभा घेऊन रहिमतपूर येथील नगरपालिका भाजपाकडे कशी राहील, याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले.

वाई, महाबळेश्वर, फलटण या विधानसभा मतदारसंघाचे मकरंद पाटील हे नेतृत्व करतात. मकरंद पाटील आणि नितीन पाटील यांच्यासाठी वाई नगरपालिकेची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली होती. या ठिकाणी ना. जयकुमार गोरे यांनी प्रचाराच्या रिंगणात उतरत माजी आमदार मदन भोसले यांच्या गटाला प्रचंड ताकत दिली. उर्वरित नगरपालिकांच्या निवडणुकीत प्रचाराची चांगलीच राळ उडाली होती. राजकीय आरोप- प्रत्यारोप, अपक्ष उमेदवारांची मोठ बांधत स्थानिक नेत्यांनी पायाला भिंगरी बांधून आपल्याच गटाचे उमेदवार कसे निवडून येतील? यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले.

कराड आणि मलकापूर हे भाजपपुढे ठरले आव्हान 

कराड नगरपालिकेमध्ये पक्षांपेक्षा स्थानिक आघाडींनीच ही निवडणूक आपल्या हातात घेतली. पक्षीय राजकारण न करता पारंपारिक आघाड्यांचे राजकारण करत या आघाड्यांनी भाजपला हात दाखवला. संपूर्ण महाराष्ट्रात परिचित असलेल्या मलकापूर नगरपालिका निवडणुकीत आहे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांनी भाजपपुढे आव्हान निर्माण केल्यामुळे कराड आणि मलकापूर या दोन्हीही निवडणुकांचे निकाल काय लागतात? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

जिल्हा काबीज करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्र्यांचे प्रयत्न 

सातारा जिल्ह्यातील ७ नगरपालिका आणि एक नगरपंचायत काबीज करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी आपापल्या नेत्यांच्या माध्यमातून रणनीती आखत जिल्ह्याच्या प्रचारात उतरत मैदाने गाजवली. कधी नव्हे ते नगरपालिका निवडणुकीसाठी स्वतः देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार प्रचारात सक्रिय झाल्यामुळे जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुका नंतर भविष्यात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका अतिशय रंगतदार ठरणार आहेत. 

तीन दिवस ड्राय डे.... प्रशासन सजग 

७ नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी उद्या मंगळवारी मतदान तर परवा बुधवारी मतमोजणी असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने नगरपालिका हद्दीतील वाईन शॉप, परमिट रूम बियर बार तीन दिवसांसाठी बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
चोरट्यांनी केली आता रेल्वे लक्ष...; सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला, रेल्वेतील चोरीच्या घटना रोखायच्या कशा?
पुढील बातमी
येत्या महिन्याभरात मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होऊ शकतो'; पृथ्वीराजबाबांचा मोठा दावा, दिल्लीपासून गल्लीपर्यंत राजकीय चर्चांना उधाण

संबंधित बातम्या