उन्हाळ्यात रक्तदात्यांनी रक्तदानाच्या सर्वश्रेष्ठ कार्यात सहभागी व्हावे : सार्वजनिक आरोग्यमंत्री मंत्री प्रकाश आबिटकर

by Team Satara Today | published on : 21 March 2025


मुंबई : रक्तदानाच्या चळवळीत महाराष्ट्र अग्रेसर आहे. उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये रक्तपेढीमध्ये रक्ताचा साठा कमी प्रमाणात असतो.त्यामुळे गरजू रुग्णांना उन्हाळ्याच्या कालावधीत देखील रक्त पुरवठा सुरळीतपणे उपलब्ध होण्यासाठी रक्तदात्यांनी उन्हाळ्यात देखील रक्तदानाच्या सर्वश्रेष्ठ कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे.

मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात राज्य रक्त संक्रमण परिषद संचलित जे. जे. महानगर रक्तकेंद्र यांच्यावतीने स्वैच्छिक रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराला दिलेल्या भेटी दरम्यान सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री.आबिटकर यांनी आवाहन केले. यावेळी आरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहायक संचालक महेंद्र केंद्रे, भायखळा, सर जे.जे. महानगर रक्तकेंद्राचे वैद्यकीय संचालक डॉ. हितेश पगारे यांच्यासह संबंधित डॉक्टर्स व रक्तदाते उपस्थित होते.

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये महाविद्यालयांना सुट्ट्या असतात. त्यामुळे स्वैच्छिक रक्तदान शिबिरांचे प्रमाण काहीसे कमी असल्याने रक्त संकलन कमी होते, परंतु उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कॅन्सर पेशंट, हिमोफिलिया, थॅलेसेमिया, सिकलसेल तसेच गर्भवती महिला या सगळ्यांना रक्ताची अत्यंत आवश्यकता असते. उन्हाळ्याच्या कालावधीत गरजू रुग्णांची रक्ताची निकड लक्षात घेता, जास्तीत जास्त रक्तदात्यांनी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मंत्री आबिटकर यांनी केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण
पुढील बातमी
'ट्रेड सर्टिफिकेट' प्राप्त न केलेल्या वाहनांची विशेष तपासणी मोहीम राबवा

संबंधित बातम्या