सातारा : ऐतिहासिक गडांच्या पायथ्याला ‘नमो पर्यटन सुविधा केंद्र’ उभारण्याची राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. मात्र, या योजनेवर टीका करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी ही केंद्रे फोडून टाकण्याचा इशारा दिला आहे. राज्य शासन म्हणून आम्ही गप्प बसणार नाही. पर्यटन वृद्धीच्या चांगल्या कामात राज ठाकरेंनी खोडा घालू नये. त्यांची तोडफोडीची भाषा अत्यंत दुर्दैवी आहे, अशी टीका राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी येथे केले.
सत्तेत नसणारे आता सत्ताधाऱ्यांवर केविलवाणी टीका करत आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुका आणि महापालिकेतील मलिदा डोळ्यासमोर ठेवूनच ठाकरे बंधूंचे राजकारण सुरू आहे, अशी टीकाही शंभूराज देसाई यांनी केली. मुंबई येथील मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी नमो पर्यटन केंद्राच्या अध्यादेशावर टीका करुन ही केंद्रे फोडून टाकण्याचा इशारा दिला होता. त्यासंदर्भात येथील शासकीय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत देसाई म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील ७५ पर्यटनस्थळांवर पर्यटकांसाठी नमो पर्यटन केंद्र उभारण्याचा राज्य सरकारचा मानस आहे .येत्या सोमवारी होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये याचा आराखडा सादर करुन त्याबाबतच्या निविदा काढल्या जाणार आहेत. महाराष्ट्राच्या पर्यटनवृद्धीला यामुळे मोठी चालना मिळणार आहे. असे असताना विरोधक मात्र राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून या योजनेवर टीका करत आहेत.’’
पंतप्रधान मोदी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरचा राज ठाकरे यांचा हा टीकेचा प्रयत्न अत्यंत केविलवाणा आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये ठाणे येथे राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांचे तोंड भरून कौतुक केले होते आणि वर्षभरातच त्यांनी पुन्हा मोदींच्या कार्यपद्धतीवर टीका सुरू केली आहे हा दुटप्पीपणा अत्यंत निंदनीय आहे, असे सांगून श्री. देसाई म्हणाले, ‘‘छत्रपती शिवरायांचा उपमर्द काँग्रेसने वेळोवेळी केला. तसेच संजय राऊत यांनी साताऱ्यात छत्रपतींच्या वारसदारांना ते खरोखर छत्रपतींचे वारसदार असल्याचे पुरावे मागितले होते. त्यावेळी ठाकरे यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही.’’
‘मुंबईचा महापौर युतीचाच असेल’
उद्धव ठाकरे व राज ठाकरे ही राजकारणातील दोन विरुद्ध टोके मुंबई महापालिका डोळ्यासमोर ठेवून एकत्र आली आहेत. त्यांना मुंबई महानगरपालिकेचा मलिदा दिसत आहे. मुंबईकर जनता ठाकरे बंधूंचा कुटिल डाव यशस्वी होऊ देणार नाही. आणि निवडणुकीनंतर महापौर महायुतीचाच असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राच्या विकासाच्या धोरणावर राजकीय हेतूनेच हे घाणेरडे आरोप सुरु आहेत.