सातारा : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार मनोज घोरपडे यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रारंभी, त्यांनी प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले.
त्यानंतर येथील कृष्णा नाक्यावरून दत्त चौकापर्यंत भव्य शक्तीप्रदर्शन करत मनोज घोरपडे समर्थकांनी रॅली काढली. यावेळी महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मनोज घोरपडे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर रॅली शिवतीर्थ दत्त चौकात आल्यानंतर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मनोज घोरपडे यांनी अभिवादन केले.
तदनंतर येथील कराड नगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात खा. उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, चित्रलेखा माने-कदम, विक्रम पावसकर, भाजप किसान मोर्चाचे रामकृष्ण वेताळ, भीमराव काका पाटील, महेश जाधव, वासुदेव माने, शंकर शेजवळ, अंजली जाधव, सीमा घार्गे, सुरेश पाटील, संप जाधव, सागर शिवदास यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी खा. उदयनराजे भोसले म्हणाले, मनोज घोरपडे हे शून्यातून उभे राहिलेले नेतृत्व असून त्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण आहे. त्यांनी मतदारसंघात भाजपच्या माध्यमातून कोट्यवधींची विकासकामे आणली आहेत. त्यामुळेच पक्षाकडून त्यांना संधी मिळाली आहे. मतदारसंघात त्यांनी केलेल्या विकासकामांमुळे आणि आज समर्थकांनी हजारोंच्या संख्येत उपस्थिती लावल्याने ते निवडून आल्यात जमा आहेत. तसेच मनोज घोरपडे, धैर्यशील कदम आणि रामकृष्ण वेताळ हे एकत्र मिळून एकदिलाने प्रयत्न करतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.