सातारा, दि. ८ : कारी, ता. सातारा येथे विवाहितेने मुलीसोबत केलेल्या आत्महत्येप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी पतीसह तिघांना अटक केली.
पती विशाल ज्ञानदेव मोरे, सासू अलका ज्ञानदेव मोरे (दोघे रा. कल्याण, मुंबई, मूळ रा. कारी) व नणंद अश्विनी प्रदीप सावंत (रा. डोंबिवली, मुंबई) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
मोरे कुटुंबीय मुंबईतून मूळ गावी आले होते. पती, सासू व नणंद हे विवाहिता ऋतुजा विशाल मोरे यांचा छळ करत होते. हा जाचहाट मार्च २०१९ पासून वेळोवेळी सुरू होता. तुला दोन्ही मुलीच झाल्या आहेत. घरातील काम येत नाही, माहेरहून दागिने आणे,' असे म्हणत त्रास दिला जात होता. सासरच्या या त्रासाला कंटाळून ऋतुजा मोरे यांनी गर्भवती असताना दि. ५ सप्टेंबर रोजी दोन मुलींसोबत विहिरीत उडी मारली. यात एक मुलगी विहिरीतील झाडाला अडकल्याने वाचली; मात्र ऋतुजा व स्पृहा मोरे (वय ३) या दोघींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.