कसाईमुक्त जनावरांच्या बाजारासाठी मिलिंद एकबोटे यांचा उपोषणाचा इशारा

पुसेगावच्या बाजार तळावर होणार उपोषण

by Team Satara Today | published on : 24 December 2024


सातारा : सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेगाव येथे देशी जनावरांचा सर्वात मोठा बाजार भरतो. या बाजारात कर्नाटक राज्यातील तसेच परप्रांतातील कसाई मोठ्या प्रमाणावर येथील देशी गाय व बैलांची खरेदी करतात ही खरेदी कत्तलीसाठी असते. आम्ही पुसेगाव चा जनावरांचा बाजार कसाई मुक्त करणार आहोत. यासाठी येत्या 26 डिसेंबर पासून पुसेगावच्या बाजार तळावर आमरण उपोषण करणार आहोत, असा इशारा अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष मिलिंद रमाकांत एकबोटे यांनी दिला आहे.

पाठक हॉल येथील पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, केंद्र शासनाने गोसेवा आयोग नेमला असून 2015 पासून हा कायदा अस्तित्वात आहे. या कायद्याकडे फारसे गांभीर्याने जिल्हा प्रशासन बघत नाही पोलिसांना सुद्धा या कायद्याची कल्पनाच नाही. हा कायदा महाराष्ट्रातील देशी जनावरांना संरक्षण देतो तरीसुद्धा या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने जनावरांच्या बाजारातील देशी गाया व बैल या कत्तलीसाठी नेल्या जातात. यामागे मोठे अर्थकारण असून विशिष्ट समुदायाला या गोमांस विक्रीतून कोट्यवधी रुपये मिळतात. तसेच हा पैसा बाहेर प्रदेशात जाऊन त्याचा वापर अतिरेकी कारवायांसाठी होतो, असा गंभीर आरोप मिलिंद एकबोटे यांनी केला. पुसेगाव चा बाजार हा कसाईमुक्त करावा त्याकरिता आम्ही बाजार तळावर 24 डिसेंबर पासून बेमुदत उपोषणाला बसणार आहोत. 

पुसेगाव यात्रा कमिटीला या उपोषणाची कल्पना देण्यात आली असून, जिल्हा प्रशासनाची परवानगी सुद्धा घेण्यात आलेली आहे. यात्रा प्रशासनाने सहकार्याची तोंडी आश्वासन दिले आहे. मात्र प्रत्यक्षात बरीचशी जनावरे ही कत्तलीसाठीच विकली जातात, यासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे अशी अपेक्षा एकबोट यांनी व्यक्त केली. यावेळी हिंदू महासभेचे अध्यक्ष एडवोकेट दत्ता सणस व प्रतिक कुलकर्णी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
पुढील बातमी
सीईओंकडून कळंबे गावाची पाहणी

संबंधित बातम्या