रहिमतपूरातील कामे सुरु न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल : आ. शशिकांत शिंदे

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्या उपोषणाला पाठिंबा

by Team Satara Today | published on : 03 October 2025


सातारा : रहिमतपूर (ता.कोरेगाव) येथील प्रशासकीय मान्यता मिळूनही गेल्या दोन ते तीन वर्षांपासून कामे ठप्प अवस्थेत आहेत. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी या कामांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. ही कामे सुरु न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी दिला आहे.

रहिमतपूर परिसरातील रस्ते व इतर विकाकामांना प्रशासकीय मान्यता मिळून कामाचे रितसर कार्यादेश देण्यात आले आहेत. प्रस्तुत कामे संबंधित ठेकेदाराने सुरु केली होती, तथापी ही कामे गेली दोन ते तीन वर्षापासून बंद असून अपूर्ण अवस्थेत आहेत. ही कामे सुरु करावीत, या मागणीसाठी जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाला दि. 3 रोजी आ. शशिकांत शिंदे यांनी भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला.

ही कामे मुदतीत पूर्ण करुन घेण्याबाबत सुनील माने यांनी व्यक्तीशः संबंधीत अधिकार्‍यास वेळोवेळी भेटून विनंती केली आहे; परंतु त्याची दखल घेतली नाही. अपूर्ण कामामुळे नागरिकांना त्रास होत असल्याने सुनील माने यांनी दि. 2 ऑक्टोबर गांधी जयंती पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे.

यासंदर्भात सुनील माने म्हणाले, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग, कोरेगाव यांनी दि. 30 सप्टेंबर रोजी मला पत्र दिले आहे. त्यात या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून हा रस्ता सुस्थितीत आहे, असा उल्लेख करुन खोटी माहिती पत्राने देण्यात आली.

या निकृष्ठ कामाची गुणवत्ता तपासणी करीता चौकशी समिती जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात यावी, व या समितीमध्ये नगराध्यक्ष आणि स्थानिक सदस्य यांचा समावेश असावा. चौकशी समिती गठीत झाल्याशिवाय मी उपोषण मागे घेणार नाही. तरी माझ्या मागण्यांचा पूर्ण विचार करुन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी सुनील माने यांनी केली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्हा ओबीसी महासंघाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; कुणबी मराठा नोंदीचे जीआर रद्द करण्याची केली मागणी
पुढील बातमी
सह्याद्रीच्या लेकींची आंतरराष्ट्रीय स्तरावर गगनभरारी

संबंधित बातम्या