पुळकोटी येथील वृध्देच्या खुनाचे गूढ उलगडले; संशयित तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

by Team Satara Today | published on : 08 November 2025


सातारा :  पुळकोटी, ता. माण येथे दि. १२ सप्टेंबर रोजी वृद्ध महिलेचा खून झाला होता. दोन महिन्यांनंतर या खुनाचा छडा लागला असून, सातारा स्थानिक गुन्हे शाखेने संशयित जयसिंह उर्फ करण आप्पासाहेब लोखंडे (वय २३, रा. शिरताव, ता. माण) यास अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी पुळकोटी येथे सुलभा मारुती गलंडे (६५ रा. पुळकोटी, ता. माण) यांचा त्यांच्याच घरात निर्घृण खून करून पुरावे नष्ट करण्यात आले होते. याप्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आणि म्हसवड पोलीस ठाण्याने संयुक्त तपास सुरू केला. अखेर दोन महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले. त्याची सहा तास कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक रोहित फाणे, उपनिरिक्षक विश्वास शिंगाडे, सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील आणि म्हसवड पोलिस ठाण्यातील ३० पेक्षा अधिक पोलिस कर्मचाऱ्यांनी केली.

घटनास्थळी सापडलेल्या तुटक पुरावे, रक्ताचे ठसे आणि चोरीचा कोणताही ठोस हेतू न सापडल्याने तपास गुंतागुंतीचा ठरू लागला होता. पुरावे जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आल्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी वेषांतर करून गावोगाव फिरत, गोपनीय बातमीदारांचे जाळे उभे केले. संशयिताच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून तांत्रिक विश्लेषण केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अण्णासाहेब चिरमुले पुरस्कार नाम फाउंडेशनला जाहीर; एक लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप
पुढील बातमी
सातारा पालिकेची मतमोजणी वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये; निवडणूक निर्णय अधिकारी बारकुल यांची माहिती; नगरपालिकेत राजकीय प्रतिनिधींशी चर्चा

संबंधित बातम्या