सातारा येथे ६४ व्या हौशी मराठी राज्य नाटय स्पर्धेचे उदघाटन; स्पर्धेमध्ये २० संघांचा सहभाग, रोज संध्याकाळी ७ वाजता नाटकाचे प्रयोग

by Team Satara Today | published on : 09 November 2025


सातारा : सातारा येथे स्पर्धेचे उदघाटन जिल्हाधिकारी  संतोष पाटील  यांच्या हस्ते व उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण साहेब, जिल्हा पुरवठा अधिकारी  वैशाली राजमाने तसेच अ.भा.ना.प. शाखा सातारचे अध्यक्ष शिरीष चिटणीस, जेष्ठ रंगकर्मी शेखर कुलकर्णी, स्पर्धेचे परीक्षक श्याम अधटकर, श्रीमती मंजुषा जोशी, डॉ. शशिकांत चौधरी या मान्यवरांचे उपस्थितीत नटराज पूजन व दीपप्रज्वलन करून पार  पडले. 

कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र राज्य गीताने करण्यात आली. प्रास्ताविक, स्वागत व आभार स्पर्धेचे स्थानिक संयोजक  कल्याण राक्षे यांनी केले. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या व उपस्थित जाणकार प्रेक्षकांचे शासनाच्यावतीने आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन देशमाने यांनी केले.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालक श्री.विभीषण चवरे यांनी नमूद केलेले आहे.  

या स्पर्धेमध्ये एकूण तब्बल २० संघांचा सहभाग असून सातारा जिल्हा मुख्य केंद्र झाल्यापासून एवढ्या मोठ्या प्रमाणात संघ सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. सातारा जिल्हा मुख्य केंद्र झाल्यामुळे येथील स्थानिक नाट्यकर्मीना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाल्याचे यावरून दिसून येतं आहे. 

दि. ७ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबरच्या दरम्यान रोज संध्याकाळी ७ वाजता नाटकाचे प्रयोग सादर होणार आहेत, राज्यनाट्य स्पर्धेतील सर्व नाटकांना जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे आणि हौशी रंगकर्मींचा उत्साह वाढवावा, असे आवाहन संचालक बिभीषण चवरे यांनी केलेले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
इच्छुक नगरसेवकांच्या मुलाखतींना भाजप करणार सुरवात : भाजप कार्यालयात होणार मुलाखती, स्थानिक समीकरणानुसार निर्णय,भाजप कोर कमिटीच्या बैठकीत चर्चा
पुढील बातमी
मेगा इंजिनिअरिंग कंपनीची मनमानी; आमदार शशिकांत शिंदे यांचा संताप, कोरेगावकरांचा जीव मुठीत, प्रशासन गप्प

संबंधित बातम्या