सातारा : सातारा शहरातील 156 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेसाठी राबवण्यात आलेले इव्हीएम मशीन कोडोली येथील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये ठेवण्यात आले आहेत. यावेळी उपस्थित असलेले उमेदवार तसेच त्यांचे प्रतिनिधी यांच्या समक्ष डबल डोर लॉक पद्धतीने सील करण्यात आले असून याबाबतच्या लॉग बुकमध्ये त्यांची स्वाक्षरी नोंदवण्यात आलेली आहे, अशी माहिती सातारा पालिका मुख्याधिकारी विनोद जळक यांनी दिली.
याबाबत मुख्याधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रक काढून याबाबत माहिती दिली आहे. या पत्रकात नमूद आहे की, 2 डिसेंबर रोजी सातारा शहरात 156 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबवण्यात आली होती. मतदान केंद्रावरून प्राप्त झालेल्या इव्हीएम मशीन एमआयडीसी कोडोली येथील शासकीय गोदामात ठेवण्यात आलेल्या आहेत. सर्व उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये ही गोडाऊन डबल डोअर लॉक पद्धतीने सील करण्यात आली असून यासंदर्भातील लॉग बुक मध्ये संबंधित प्रतिनिधींची स्वाक्षरी नोंदवण्यात आलेली आहे. गोदाम बंद करण्यासाठी प्रक्रिया विहित कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे आणि गोडाऊनचा ताबा सातारा पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात आलेला आहे.
गोडाऊनच्या परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा
या गोडाऊनच्या परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त 24 तास ठेवण्यात आलेला असून सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे .येथे संबंधित उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित राहू शकतात किंवा सीसीटीव्ही यंत्रणाचे फुटेज पाहू शकतात मात्र या करता उमेदवाराचा प्रतिनिधी यांनी आपली ओळखपत्र आणणे आवश्यक आहे, असे आवाहन विनोद जळक यांनी केले आहे.