सातारा : सातारा जिल्हा रूग्णालय येथे नव्याने होत असलेल्या कॅथलॅबसाठी आवश्यक असणारी उद्वाहक यंत्रणा, विद्युत पुरवठा या कामासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नातून ७१ लाख ५८ हजार ५३५ रुपये निधीला मंजूरी मिळाली आहे. त्यामुळे सुसज्ज कॅथलॅब लवकरच सुरु होऊन साताऱ्यातच रुग्णांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया होणार आहे. ना. शिवेंद्रसिंहराजे हृदय रुग्णांसाठी आरोग्यदूत ठरले असून रुग्णांसह नातेवाईकांना दिलासा मिळणार आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांच्या विशेष प्रयत्नातून सातारा जिल्हा रुग्णलय येथे हृदय रुग्णांसाठी आवश्यक असणारी कॅथलॅब सुविधा मंजूर झाली होती. जिल्हा रुग्णालय येथे कॅथलॅब स्थापन करणेकरीता बांधकाम सुरु असून याचा वेळोवेळी आढावा ना. शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांचेकडून सातत्याने घेतला जात आहे. या कॅथलॅब निर्मितीमुळे सातारा जिल्हयातील गरीब व गरजू हृदय रुग्णांना मोफत व दर्जेदार उपचार मिळण्याची सुविधा उपलब्ध होणार असल्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे हृदय रुग्णांना उपचाराकरीता पुणे, मुंबई अथवा अन्य ठिकाणी जावे लागणार नाही.
सुसज्ज कॅथलॅबमध्ये हृदय रुग्णांकरीता बाह्य रुग्ण सेवा, तसेच ईसीजी, टु-डी ईको व हृदय रुग्णांकरीता आवश्यक असणाऱ्या सर्व चाचण्या तसेच ॲन्जीओग्राफी,ॲन्जीओप्लास्टी व बायपास सर्जरी आदी सुविधा मोफत उपलब्ध होणार आहेत. तसेच हृदय रुग्णांकरीता आवश्यक असणारे अत्याधुनिक सोयी सुविधांनीयुक्त असे १० बेडचा अतिदक्षता विभागही लवकरच सुरु करण्यात येणार आहे. दिवसेंदिवस बदलती जीवनशैली, चुकीची आहार पध्दती, व्यायामाचा अभाव यामुळे सर्व वयोगटामध्ये हृदयाशी संबंधित अनेक आजार बळावत आहेत. याकरिता योग्य उपचारासाठी मोठया प्रमाणावरती खर्च तसेच वेळ वाया जात होता. जिल्हयातच आता अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध झाल्यामुळे सातारा जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे जिल्हयातील आरोग्य सुविधांना नवा आयाम मिळेल व गोरगरीब गरजू रुग्णांना दिलासा मिळेल, असा विश्वास मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे. कॅथलॅबसाठी आवश्यक असणारी उद्वाहक यंत्रणा, विद्युत पुरवठा या कामासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व स्तरातील नागरिकांकडून याबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.