बारामती : पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेतून बारामती परिमंडळातील 16 हजार 829 घरगुती ग्राहकांना 128 कोटी 10 लक्ष रूपये अनुदन मंजुर करण्यात आले असून त्यापैकी 16 हजार 88 ग्राहकांना 122 कोटी 29 लक्ष रूपये अनुदान वितरीत करण्यात आले आहे. त्यात बारामती मंडळातील 2 हजार 447 (18 कोटी 47 लक्ष), सातारा मंडळातील 4 हजार 731 (35 कोटी 11 लक्ष) तर सोलापूर मंडळातील 8 हजार 910 (68 कोटी 71 लक्ष ) ग्राहकांचा समावेश आहे. उर्वरीत 741 ग्राहकांना लवकरच मंजुर अनुदान वितरीत करण्यात येईल.
महावितरणकडून सेवा पर्वाच्या दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीसाठी विशेष अभियानाव्दारे विविध जनजागृती उपक्रम राबविले जात आहेत. घरगुती ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे महावितरणचे आवाहन आहे. या योजनेतून सौर प्रकल्पासाठी १ किलोवॅटसाठी ३० हजार रुपये, २ किलोवॅटसाठी ६० हजार रुपये व ३ किलोवॅटसाठी ७८ हजार रुपये अनुदान केंद्र शासनाकडून थेट मिळेल. तर हाऊसिंग सोसायटी व निवासी कल्याण संघटनांना ५०० किलोवॅटपर्यंत प्रती किलोवॅट १८ हजार रूपये अनुदान मिळेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी https://pmsuryaghar.gov.in या राष्ट्रीय पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावी.
घराच्या छतावर सौरप्रकल्प बसवून वीजनिर्मिती करायची व त्याद्वारे घराची विजेची गरज पूर्ण करायची, अशी ही योजना आहे. वापराइतकी सौर वीजनिर्मिती झाल्यास वीजबिल शून्य येते अर्थात वीज मोफत मिळते. अधिकची निर्माण झालेली वीज महावितरणला विकून उत्पन्नही मिळते.१ किलोवॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पासाठी साधारणपणे 108 चौरस फूट जागा आवश्यक असून या प्रकल्पाद्वारे वार्षिक सरासरीने मासिक सुमारे १२० युनिट वीज निर्मिती होते. मासिक वीज बिलात बचत होऊन गुंतविलेल्या रक्कमेची 4 ते 5 वर्षात परतफेड मिळते.
पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेतून घराच्या छतावर बारामती परिमंडळतील 18 हजार 271 ग्राहकांनी 61.48 मेगावॅट क्षमतेची सौरछत (सोलर रूफ टॉप) यंत्रणा बसविली आहे. त्यात बारामती मंडळातील 2 हजार 851 (9.83 मेगावॅट), सातारा मंडळातील 5 हजार 299 (16.95 मेगावॅट), तर सोलापूर मंडळातील 10 हजार 121 (34.70 मेगावॅट) ग्राहकांचा समावेश आहे.