सातारा : आपल्या मतदारसंघात न भूतो न भविष्यती विकासकामे केली आहेत, पिढ्यानपिढ्याचा दुष्काळी कलंक पुसण्याची लढाई अंतिम टप्प्यात आणली आहे, आपली ताकद अधिक आहे, आपला पक्ष प्रबळ आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे विरोधकांसह ना. अजित दादांची राष्ट्रवादीही स्वबळावर लढण्याची भाषा करत असेल तर आपणही स्वबळावरच लढू असा निग्रह भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांच्यासमोर व्यक्त केला. ना. गोरेंनीही सर्वांना विकासकामांच्या जोरावर आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणूकांमध्ये शतप्रतिशत विजयाचा कानमंत्र दिला.
बोराटवाडी येथे खटाव आणि माण तालुक्यातील भाजप पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ना. जयकुमार गोरे यांनी सर्वांची मते जाणून घेतली. यावेळी भाजप कार्यकारिणी सदस्या सोनिया गोरे, मा. आ. दिलीपराव येळगावकर, अरुण गोरे, अर्जुन काळे, डॉ. संदीप पोळ, शिवाजीराव शिंदे, अनिल माळी, प्रशांत गोरड, गणेश सत्रे, हरिभाऊ जगदाळे, धनंजय चव्हाण, चिन्मय कुलकर्णी, टी. आर. गारळे, सोमनाथ भोसले, विशाल बागल, काकासाहेब बनसोडे, डॉ. विवेक देशमुख आणि खटाव, माण तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना. गोरे म्हणाले, साडेसात वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जाहीर झाल्यावर गायब झालेले विरोधक घराबाहेर पडायला लागले आहेत. इतकी वर्षे त्यांना माण - खटावच्या जनतेप्रती काही देणे घेणे नव्हते. आता त्यांना गट आणि गण आठवायला लागले आहेत. त्यांना तालुक्याच्या, गावोगावच्या विकासाचे काहीच देणे घेणे नाही. त्यामुळे ते काय उपद्व्याप करतात याकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळ नाही. आज राज्याच्या ग्रामविकासाची धुरा आपल्याकडे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचे कामकाज चालवणाऱ्या विभागाचे मंत्रीपद आपल्याकडे आहे. आपण गावोगावी न भूतो न भविष्यती विकासकामे केली आहेत. आपल्याला कल्पना होती त्यापेक्षा कितीतरी अधिक या सरकारने आपल्या दोन्ही तालुक्यांसाठी दिले आहे. त्यामुळे आगामी निवडणूकांमध्ये आपल्याला शत प्रतिशत यश मिळविण्याची जबाबदारी उचलावी लागणार आहे.
आपण केलेली विकासकामे, सरकारने राबवलेल्या विविध कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहचवूनच आपण यश मिळवणार आहोत. ही निवडणूक फक्त निवडणूक न रहाता लोकशाहीचा एक उत्सव म्हणून पुढे आली पाहिजे. सर्वसामान्य जनतेचा आपल्यावर विश्वास आहे. आपणच विकासाची, दुष्काळमुक्यीची स्वप्ने पूर्ण करतोय हे जनता पहात आहे. त्यामुळे यापुढेही आपल्यावर नेतृत्व करण्याची जबाबदारी निश्चित येणार आहे. आपल्याकडे एका जागेसाठी दहा उमेदवार इच्छुक आहेत. सगळेच इच्छुक ताकदीचे आहेत. भाजप पक्षाच्या कार्यपद्धतीनुसार जे निकषात बसतील त्यांना संधी मिळणार आहे. पक्ष जो उमेदवार देईल तो उमेदवार निवडून आणायची जबाबदारी आपल्या सर्वांना घ्यायची आहे. केंद्रात आणि राज्यात आपली सत्ता असल्याने विकासकामांमध्ये आपण अव्वल आहोत. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्येही आपण निर्विवाद यश मिळविण्यासाठी अंग झटकून कामाला लागण्याचे आवाहन ना. गोरे यांनी केले.
झेडपी, पंचायत समिती स्वबळावरच
पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक गट आणि गणात भाजपच्या माध्यमातून ना. जयकुमार गोरे यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर आपणच प्रबळ असल्याचे दाखले दिले. कशात काही नसताना समोरुन स्वबळाची भाषा होवू लागली आहे, त्यामुळे आपण कोण काय करतोय न पहाता स्वबाळावर झेडपी, पंचायत समितीच्या निवडणूका लढण्याचा निर्धार ना. गोरेंसमोर व्यक्त केला. ना. गोरेंनीही लागलीच निवडणूक जिंकण्यासाठीचे कानमंत्र सर्वांना दिले.