सातारा : शेतीसाठी जेथे पूर्वीचे रस्ते आहेत, तेथे नवे रस्ते तयार करण्यासाठी शेतकर्यांच्या जमिनी ओरबाडून घेण्याचे षडयंत्र रचले जात आहे. आधीच शेती क्षेत्र कमी होत चालले असताना शेतकर्यांवर होणारा हा अन्याय तत्काळ थांबवा, अशी मागणी आ. शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेत केली.
विधान परिषदेमध्ये चर्चेदरम्यान आ. शशिकांत शिंदे म्हणाले, महसूल विभागाने तुकडाबंदी उठवण्याचा जो निर्णय घेतला तो स्तुत्य आहे. तातडीच्या जमिन मोजणीचा कालावधी 30 दिवसांवरुन 15 दिवसांपर्यंत घेतलेला निर्णय देखील शेतकर्यांसाठी आनंददायी आहे. मात्र, महसूल विभागातील अधिकारी सोयीने निवाडा देत असल्याचे समोर येते, त्यामुळे महसूल विभागाने याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा. दरम्यान, शेतासाठी पूर्वीचा रस्ता असताना नवीन रस्ता तयार करण्यासाठी शेतकर्यांच्या जमिनी घेण्याचे षडयंत्रही आखले जात आहे. त्याला शासनाने चाप बसवावा. शेतीक्षेत्र आधीच कमी होत चालले असल्याने तुकड्यामध्ये शेती करण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे. शेतकर्यांवर होणारा हा अन्याय थांबवला जावा. पूर्वीचा रस्ता असताना नवीन रस्त्याची मागणी होत असेल तर महसूल प्रशासनाने ती तत्काळ फेटाळून लावावी, अशी मागणीही आ. शिंदे यांनी केली.
दरम्यान, शासनाने खासगी मोजणीला अधिकृत मान्यता देण्याचा घेतलेला निर्णयही चांगला आहे. आता गतीने जमिनींची मोजणी होण्याची आशा आहे. रस्त्यांचे नकाशे आता लवकर अद्ययावत करण्यात यावेत. पाणंद रस्त्यांवर जी अतिक्रमणे झाली आहेत, हे रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी कुठलीही परवानगी घेण्याची गरज नाही. यातील राजकीय लुडबूड थांबवावी, अशी मागणी देखील आ. शशिकांत शिंदे यांनी केली.