सातारा, दि. १६ : "लोकसहभागातून शाश्वत विकास आणि गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान ही संधी आहे. यात ८ मुख्य घटक समजून घ्या आणि १०० गुणांकन मिळवण्यासाठी लोकसहभागातून नियोजन आणि अंमलबजावणी करावी. या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करून जिल्हा नाही तर राज्यस्तरीय पुरस्कार मिळवून आपल्या संभाजीनगर बरोबर जिल्ह्याचा लौकिक वाढू या", अशी साद पत्रकार विजय जाधव यांनी घातली.
पाटण तालुक्यातील तारळे खोऱ्यातील संभाजीनगर ( वेखंडवाडी) येथे जकातवाडी (सातारा ) यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क या महाविद्यालयाच्या एम.एस.डब्लू भाग एक च्या विद्यार्थ्यांचा १० दिवसीय निवासी ग्रामीण शिबीर दि.१३ ते २२ सप्टेंबर कालावधीत सुरू झाले आहे. यात " मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान" यावर पत्रकार विजय जाधव यांनी मार्गदर्शन केले.
भैरवनाथ मंदिरात झालेल्या या प्रबोधन कार्यक्रमात उपसरपंच रामचंद्र पवार, सर्व ग्रामपंचायत सदस्य, महिला, युवक, जेष्ठ नागरिक, गावातील सर्व संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वच्छता, शिक्षण, आरोग्य, ग्रामपंचायत कामकाज, रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन, सौरऊर्जा वापर यासह ८ घटक विषयातील १०० गुणांकन विषय आणि त्यातील प्रत्येक गुण मिळविण्यासाठी करावी लागणारी तयारी सविस्तर समजावून सांगितली.
प्रास्ताविक संकेत माने स्वागत उपसरपंच रामचंद्र पवार आणि पोलीस पाटील किरण पवार यांनी तर आभार प्रा.जीवन बोराटे मानले. यावेळी एम एस डब्लू महाविद्यालयचे विद्यार्थींनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा आषयवर पथनाट्य सादर करून केले.