सातारा : विभागीय वनअधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग सातारा मार्फत सातारा जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांसाठी निसर्ग अभ्यास शिबीर दि. 8 व 9 डिसेंबर 2025 रोजी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या कोयना व हेळवाक वन्यजीव परिक्षेत्रामध्ये आयोजित करण्यात आला होता. या निसर्ग अभ्यास शिबीरामध्ये सातारा जिल्ह्यातील 9 तालुक्यातील 10 शाळा व महाविद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनेच्या एकूण 50 विद्यार्थी व त्यांचे समन्वय शिक्षक सहभागी झाले होते.
या शिबीरात वन्यजीव अधिवास, मानव वन्यजीव संघर्ष वन्यजीवांपासून बचाव करावयाच्या साधनांची माहिती व बचाव, वन्यजीव विभागाअंतर्गत येणाऱ्या वाघांच्या स्थलांतराची माहिती व जैवविविधता यावर मार्गदर्शन केले. निसर्ग भ्रमंती करून पक्षांची ओळख करून पक्षी निरीक्षण याद्वारे विद्यार्थ्यांना निसर्ग, जैवविविधता, वन आणि मानवी जीवन यांच्यातील संबंध, वन व पर्यावरण संरक्षण व संवर्धन याबाबतचे महत्त्व पटवून देऊन जनजागृती करण्यात आली.
निसर्ग शिबीराच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सह्याद्री पर्वत रांगातील सर्वात सुंदर निसर्ग मार्ग, रामबाण निसर्ग, कोकण कडा परिसरात पाऊल वाटेने भ्रमंती, सदर ट्रेक मध्ये रामबाण परिसरात आढळणाऱ्या समृध्द जैवविविधतेची माहिती, गवताळ प्रदेशाबाबतची माहिती देण्यात आली. कोयना धरण विभागातील प्रसिध्द असलेल्या नेहरू उद्यानालाही विद्यार्थ्यांची भेट घडवून आणण्यात आली. सदर नेहरु उद्यान मधील माहिती केंद्रामध्ये लघुपटा द्वारे कोयना धरणाची निर्मिती पासुनची सविस्तर माहिती, कोयना धरण निर्मितीचे टप्पे व पुर्नत्वानंतर उदघाटन प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मा. यशवंतराव चव्हाण यांनी जनतेस केलेल्या संबोधनाची माहिती देण्यात आली. रासाटी निसर्ग पर्यटन केंद्रामध्ये निर्माण करण्यात आलेल्या रॅपिड रेस्कु सेंटर बाबतची माहिती देण्यात आली. निसर्ग शिबीर हे, विभागीय वनअधिकारी सामाजिक वनीकरण सातारा रेश्मा व्होरकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक-1 सामाजिक वनीकरण सातारा एस. एस. शिरगावे, तथा समन्वय अधिकारी राष्ट्रीय हरित सेना तसेच अर्जुन गंबरे, अमर चंद्रकांत शिंदे, वनपाल प्रशांत तानाजी मोहिते, सीमा महादेव शेलार, वनरक्षक वसंत चिधू गवारी, महेश साहेबराव सोनवले, यांचेमार्फत सदर निसर्ग शिबीराचे उत्कृष्ठ नियोजन करण्यात आले.