कराड : न्यायालयाचा निर्णय मला मान्य नाही, असे सांगून ग्रामसेवकासह गावातील प्रतिष्ठित लोकांच्या अंगावर काठी घेऊन धावून येवून सरकारी कामकाजात अडथळा आणणार्या मरळी, ता. पाटण येथील एकास न्यायालयाने दोन वर्ष साधा कारावास आणि पाच हजार दंडाची शिक्षा सुनावली. कराड येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश यू. एल. जोशी यांनी हा निकाल दिला.
पुरुषोत्तम धोंडजी कदम (वय 74) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. सरकार पक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 10 जुन 2019 रोजी सकाळी दहा वाजता मरळी येथे बसथांबा ते मातंग वस्तीकडे जाणार्या डांबरी रस्त्याचे कामकाज पाहण्यासाठी प्रतिष्ठित ग्रामस्थ, पदाधिकार्यांना घेऊन ग्रामविकास अधिकारी अमोल विठ्ठल सुळ हे गेले असता रस्त्यालगत असलेल्या शेताचे मालक पुरुषोत्तम धोंडी कदम हे तेथे आले. त्यांनी इथून रस्ता करायचा नाही, असे म्हणून रस्त्याच्या कामास अडथळा आणला. रस्त्याचे काम करण्यासाठी हजर असलेल्या लोकांच्या अंगावर काठी घेऊन धावून गेले.
त्यावेळी ग्रामविकास अधिकारी यांनी रस्ता करण्याची परवानगी न्यायालयाकडून मिळाल्याचे सांगितले. मात्र, यावेळी आरोपीने मला कोर्टाचा निर्णय मान्य नाही, तुम्ही रस्ता करायचा नाही, असे म्हणून अंगावर काठी घेऊन धावत येत रस्त्याचे कामकाज थांबवले.
याप्रकरणी ग्रामविकास अधिकारी अमोल सूळ यांनी पाटण पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली होती. त्या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर यांनी केला. या खटल्याचे कामकाज सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पुष्पा जितेंद्र जाधव यांनी चालवले.