पांगारी गावाकडे जाण्याऱ्या रस्त्यावर बिबट्याचे दर्शन

भिलार, पांगारीमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये बिबट्या लोकवस्तीत फिरताना आढळला

by Team Satara Today | published on : 28 September 2025


पाचगणी :  महाबळेश्वरहून पाचगणीकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरील पांगारी फाट्यावरून पांगारी गावाकडे जाण्याऱ्या  रस्त्यावर काल सायंकाळच्या सुमारास बिबट्याने ग्रामस्थ व वाहनचालकांना दर्शन दिल्याने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. गेले दोन दिवस भिलार, पांगारी या भागांमध्ये बिबट्याचे दर्शन होत आहे. काही जणांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये बिबट्या  लोकवस्तीमध्ये फिरताना, वावरताना दिसत आहे. 

त्याचबरोबर पांगारी गावाकडे जाण्याच्या रस्त्यावर ग्रामस्थ महेंद्र पांगारे चारचाकी गाडीतून जात असताना अचानक त्यांना शेजारच्या झुडुपातून बिबट्या बाहेर आल्याचे दिसले. बिबट्या दिसताच गाडीतील सर्वांचीच अक्षरश: गाळण उडाली. तरीसुद्धा पांगारे यांनी मोबाइलमध्ये त्याचे चित्रण केले.  गाड्यांचा आवाज येताच तो भला मोठा बिबट्याने दमदारपणे रस्त्यावर चालत मार्गक्रमण केले.  

वन्य प्राण्यांना जंगलामध्ये पुरेसे अन्न न मिळाल्यामुळे हे वन्यप्राणी गावाच्या दिशेने येताना दिसत आहेत. बिबट्यासारखा प्राणी लहान कुत्रे, कोंबडी, मांजर यांच्याशी शिकारीसाठी गावाखेड्यामध्ये घुसताना दिसत आहेत. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

अनेक नागरिकांनी लगेच सोशल मीडियाद्वारे या बिबट्याबद्दल माहिती देऊन नागरिकांना सावध प्रवास करण्याचा इशारा दिला आहे. हा बिबट्या या डोंगर परिसरात वावरत असून सर्वांनी सतर्कपणे प्रवास करावा व आपली वाहने सावधानतेने चालवावीत, असे नमूद केले आहे. त्यामुळे वन विभागाने या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी वाहनचालक व येथील नागरिकांनी केली आहे. 

सध्या नवरात्रोत्सव चालू असून गावचे जननी माता मंदिर  गावच्या वरील बाजूस झाडीत असल्याने महिला, मुले व नागरिक दररोज सायंकाळी मंदिराकडे येत असतात. त्यामुळे सर्व ग्रामस्थानी दक्षता बाळगावी व काळजी घ्यावी, असे आवाहन बिबट्याला प्रत्यक्षदर्शी पाहणारे महेंद्र पांगारे यांनी केले आहे. 



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
छ. शिवरायांच्या दैदिप्यमान पराक्रमाची साक्ष देणारा किल्ले प्रतापगड शेकडो मशालींनी उजळला
पुढील बातमी
मुंबई, रायगड, नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यांतील घाट विभागात ऑरेंज अलर्ट

संबंधित बातम्या