कोळे : चचेगाव (ता. कराड) अचानक लागलेल्या आगीत साडेतीन एकरातील ऊस जळून खाक झाला. जिल्हा परिषद शाळेलगत मळा नावाच्या शिवारात दुपारी ही घटना घडली. आठ शेतकऱ्यांचे मिळून सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले.
चचेगाव जुने गावठाणात जाणाऱ्या रस्ता परिसरात उसाची मोठी शेती आहे. मळा नावाच्या शिवारात एका शेतात मध्येच आग लागली. परिसरातील शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. बघता-बघता साडेतीन एकरांवरील ऊस जळून खाक झाला.
चंद्रकांत पवार, राजेंद्र पवार, सुभाष निकम, दादासो पवार, अण्णासो पवार, सदाशिव पवार, शिवाजी पवार, अलका पवार आदी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सुमारे पाच लाखांचे नुकसान झाल्याचे तलाठी अर्चना गावडे यांनी केलेल्या पंचनाम्यात नमूद केले आहे. वर्षा निकम यांनी याकामी सहकार्य केले. रयत कारखाना व्यवस्थापनाने तातडीने दखल घेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या उसाला तोड दिली.