सातारा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहावे सरसंघसंचालक मोहनजी भागवत यांनी साताऱ्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा सहकार्यवाह संदीप आठल्ये यांच्या घरी शनिवारी सायंकाळी सदिच्छा भेट दिली. येथील कार्यकारिणीच्या कार्यकर्त्यांशी त्यांनी अनौपचारिक गप्पा करत त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व संघ संचालक मोहनजी भागवत हे शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते येडूर येथील कार्यक्रम आटोपून पुण्याच्या दिशेने जात असताना त्यांनी काही काळ साताऱ्यात विश्रांती करणे कामी संदीप आठल्येयांच्या व्यंकटपुरा पेठेतील निवासस्थानाला सदिच्छा भेट दिली. यावेळी भागवत यांचे जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने स्वागत करण्यात आले.
सातारा जिल्हा कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांची मोहन भागवत यांनी ओळख करून घेत अनौपचारिक गप्पांमधून त्यांना विविध उपक्रमांची माहिती देत संघटनात्मक कार्याची प्रेरणा दिली. यावेळी त्यांनी थालीपीठ व दहीभात अशी हलकी न्याहारी केली. तासाभराच्या विश्रांतीनंतर मोहन भागवत तातडीने पुण्याच्या दिशेने रवाना झाले. मोहन भागवत यांच्या धावत्या दौऱ्याची साताऱ्यात चर्चा होती. व्यंकटपुरा पेठेतील मंगळवार तळे ते बहुलेश्वर मंदिर या दरम्यान तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.