सातारा : दिव्यांग हे समाजाचा अविभाज्य घटक असून त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे ही प्रशासनातील प्रत्येक अधिकाऱ्याची जबाबदारी आहे. दिव्यांगांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याबरोबर स्वयंरोजगारसाठी प्रशिक्षण देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयामार्फत दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 कलम 36 अन्वये दिव्यांगांप्रती संवेदनशीलता व जाणीव जागृती जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी विद्यानंद चल्लावार, महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा सुचित्रा काटकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
दिव्यांग बांधवाचे विविध विभागांना कामासंदर्भात अर्ज येतात. या अर्जांवर विभाग प्रमुखांनी सकारात्मक विचार करुन तातडीने अर्ज निकाली काढावे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, दिव्यांगांची काम करणे ही एक प्रकारे ईश्वरी सेवाच आहे. दिव्यांग बांधवाचे एकही निवेदन प्रशासनाला येणार ही या पद्धतीने कार्यालय प्रमुखांनी कामे करावीत. अशा कामांची दखल नक्की घेण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी कार्यशाळेप्रसंगी सांगितले.
प्रास्ताविकात दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी श्री. चल्लावार यांनी प्रास्ताविकात कार्यशाळा घेण्याचा उद्देश सांगितला तर दिव्यांग व विकास महामंडळाचे सेवा निवृत्त महाव्यवस्थापक नंदकुमार फुले यांनी दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 कलम 36 या विषयी उपस्थिती अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.