सातारा : बिभवी ता. जावली येथे गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन तीन घरे जळून खाक झाली. या तीनही कुटुंबाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. त्यांचे संसार पुन्हा फुलवण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या जातील. जळीतग्रस्तांना सर्वोतोपरी मदत केली जाणार असून शासनाच्या माध्यमातून त्यांना पक्की घरे बांधून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
बिभवी येथे सिलेंडरचा स्फोट होऊन वसंत कदम, पांडुरंग कदम, विठ्ठल कदम, दत्तात्रय कदम, प्रभाकर कदम या कुटुंबीयांची घरे जळाली. यामध्ये घरांचे नुकसान होऊन संसारोपयोगी साहित्य जाळून खाक झाले. या जळीतग्रस्त कुटुंबीयांची भेट घेऊन ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी त्यांना अन्नधान्य, निवारा आदी तातडीची मदत उपलब्ध करून दिली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, मछिंद्र मुळीक, सागर धनावडे, महेश देशमुख, पांडुरंग वाघ, प्रवीण देशमुख, उपसरपंच कांताराम शिंदे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
घडलेल्या दुर्घटनेची माहिती घेऊन ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी पीडित कुटुंबांना धीर दिला. लवकरच शासनाच्या माध्यमातून त्यांना पक्की घरे बांधून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे ना. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले. त्यासंदर्भात शासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी आवश्यक त्या सूचना केल्या.