मुंबई : 339 धावांचे तगडे आव्हान, समोर ऑस्ट्रेलियासारखा 7 वेळा विश्वचषक जिंकणारा तगडा प्रतिस्पर्धी, भरीत भर म्हणून प्रतीका रावलसारखी बहरातील फलंदाजही जायबंदी होऊन स्पर्धेबाहेर फेकली गेलेली. पण, या साऱ्या प्रतिकूल परिस्थितीतही जिंकली ती भारतीय रणरागिणींचा दुर्दम्य आशावाद! जेमिमा रॉड्रिग्यूजचे खणखणीत शतक, तिने हरमनप्रीतसह केलेली 167 धावांची अविश्वसनीय भागीदारी निर्णायक ठरली आणि याच बळावर भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियाला चारीमुंड्या चीत करत भारताने आयसीसी महिला वन डे विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली!
विजयासाठी 339 धावांचे तगडे आव्हान असताना शेफाली वर्मा अवघ्या 10 धावांवर तंबूत परतल्याने भारताला प्रारंभीच पहिला धक्का बसला. सहकारी सलामीवीर स्मृती मानधना देखील 24 धावांवर बाद झाल्यानंतर भारताची 2 बाद 59 अशी स्थिती होती. मात्र, याचवेळी जेमिमा रॉड्रिग्यूज 134 चेंडूत 14 चौकारांसह 127 व हरमनप्रीत कौर 88 चेंडूत 10 चौकार, 2 षटकारांसह 89 यांची जोडी क्रीझवर जमली आणि या उभयतांनी तिसऱ्या गड्यासाठी 167 धावांची धडाकेबाज खेळी साकारत ऑस्ट्रेलियन संघाच्या पायाखालची अक्षरश: वाळू सरकवली.
भारतीय संघाने ४८.३ षटकांतच विजयाचे लक्ष्य यशस्वीरित्या गाठले. भारताच्या विजयात जेमिमा रोड्रिग्सने नाबाद १२७ धावांची ऐतिहासिक खेळी साकारली आणि संघाला अंतिम फेरीत पोहोचवण्यात सिंहाचा वाटा उचलला. अमज्योत कौरने विजयाचा चौकार मारताच, या सामन्यात उत्कृष्ट आणि निर्णायक खेळी साकारणारी जेमिमा रोड्रिग्स मैदानातच भावूक झाली.आता २ नोव्हेंबर रोजी भारताची अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लढत होणार आहे.
डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात 'कांगारू' संघाने प्रथम फलंदाजी करताना सर्व गडी गमावून ३३८ धावांचा डोंगर उभा केला, ज्यात फीबी लिचफील्डने (११९) नेत्रदीपक शतक झळकावले. प्रत्युत्तरात, भारतीय संघाने जेमिमा रॉड्रिग्जच्या (१२७*) शानदार शतकाच्या जोरावर हे मोठे लक्ष्य सहज गाठले.
एलिसा हिली (५) लवकर बाद झाल्यानंतर लिचफील्ड (११९) आणि एलिस पेरी (७७) यांनी ऑस्ट्रेलियन डावाला आकार दिला. मधल्या फळीत ॲश्ले गार्डनरने ४५ चेंडूंमध्ये ६३ धावांची झंझावाती खेळी करत संघाला ३०० धावांच्या पार पोहोचवले.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. शेफाली वर्मा (१०) आणि स्मृती मानधना (२४) हे सलामीचे फलंदाज लवकर बाद झाले. त्यानंतर, रॉड्रिग्ज आणि कर्णधार हरमनप्रीत कौर (८९) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. अखेरीस, दीप्ती शर्मा (२६) आणि रिचा घोष (२६) यांनी महत्त्वपूर्ण योगदान देत भारताला विजय मिळवून दिला.
लिचफील्डचे विश्वचषकातील पहिले शतक
लिचफील्डने अष्टपैलू पेरीसोबत दुसऱ्या विकेटसाठी १३३ चेंडूंमध्ये १५५ धावांची विक्रमी भागीदारी रचली. लिचफील्डने ९३ चेंडूंचा सामना करताना ११ चौकार आणि ३ षटकारांसह ११९ धावा कुटल्या. हे तिच्या वनडे कारकिर्दीतील तिसरे, तर भारताविरुद्धचे दुसरे शतक ठरले, जे तिने ७७ चेंडूंमध्ये पूर्ण केले. विशेष म्हणजे, हे तिचे वनडे विश्वचषकातील पहिलेच शतक ठरले.
पेरीने ६६ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. तिने ८८ चेंडूंचा सामना करताना ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ७७ धावांची उत्कृष्ट खेळी केली. हे तिच्या वनडे कारकिर्त्यातील ३७वे आणि भारताविरुद्धचे ८वे अर्धशतक ठरले. क्रिकइन्फोनुसार, पेरीने विश्वचषकात आतापर्यंत ३२ सामने खेळले असून, ४९.८८ च्या प्रभावी सरासरीने एकूण ८४८ धावा केल्या आहेत.मधल्या फळीत फलंदाजीला आलेल्या ॲश्ले गार्डनरने ४५ चेंडूंत ४ चौकार आणि तेवढ्याच षटकारांच्या मदतीने ६३ धावांची तुफानी खेळी केली. तिचा डाव धावबाद झाल्याने संपुष्टात आला. आठव्या विकेटच्या रूपात ती पॅव्हेलियनमध्ये परतली. शेवटच्या षटकांमध्ये वेगाने धावा जमा करत तिने संघाला ३०० च्या पुढे नेण्यात मोलाची भूमिका बजावली.केवळ २२ वर्षे १९५ दिवसांची असताना, लिचफील्ड महिला विश्वचषक नॉकआउटमध्ये शतक झळकावणारी सर्वात युवा फलंदाज देखील बनली आहे. यासह, ती ऑस्ट्रेलियाकडून या स्पर्धेत शतक झळकावणारी दुसरी सर्वात युवा खेळाडू ठरली आहे.
रॉड्रिग्जची दमदार विजयी खेळी
लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने १३ धावांवर पहिली विकेट गमावली असताना रॉड्रिग्ज फलंदाजीसाठी मैदानावर आली. दबावाच्या परिस्थितीतही तिने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा सामना करत धावांचा ओघ कायम ठेवला. तिने ५७ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. ७२ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर असताना तिला जीवदान मिळाले, जेव्हा प्रतिस्पर्धी कर्णधार ऍलिसा हिलीने तिचा सोपा झेल सोडला. तिने ११५ चेंडूंमध्ये आपले शानदार शतक पूर्ण केले.
हरमनप्रीतची कर्णधारपदाला साजेसी खेळी
५९ धावांवर भारताची दुसरी विकेट पडली, तेव्हा कर्णधार हरमनप्रीत कौर क्रीजवर आली. तिने सुरुवातीला संयमाने फलंदाजी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. एकदा मैदानावर स्थिरावल्यानंतर तिने धावगती वाढवत आकर्षक फटकेबाजी केली. तिने ८८ चेंडूंमध्ये १० चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ८९ धावांची उत्कृष्ट खेळी करून आपले योगदान दिले.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
